नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आरटीओच्या ‘रडार’वर

नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आरटीओच्या ‘रडार’वर
Published on: 

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘रडार’ यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून सात महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर सुमारे ८९ कोटी २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात दुचाकीचालक टॉपला असल्याचे समोर आले आहे.
राज्य परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. या वाहनांवर अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, या यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण २०० मोटार वाहन निरीक्षक, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना देण्यात आले होते. त्यातील नऊ अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असून त्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात आहे. आरटीओच्या वायूवेग पथकांकडून मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस हायवे, पुणे-बंगरूळ आणि पुणे-नाशिक महामार्गांवर आणि शहरातील अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ ठरणाऱ्या मार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड आरटीओकडून एप्रिल ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

इंटरसेप्टर वाहनांचे वैशिष्टे
नव्या ‘इंटरसेप्टर’ वाहनांमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा आहे. वाहनांच्या छतावर किंवा मागे अत्याधुनिक रडार बसवलेले कॅमेरे सुमारे ३०० मीटर ते १.५ किलोमीटर अंतरावरून वेगाने जाणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र आणि व्हिडिओ टिपू शकतात. ‘ई-चलन’ यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ‘ब्रेथ अ‍ॅनलायजर’ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन ः वाहनांची संख्या
हेल्मेट - २,२७७
सिटबेल्ट - ६८६
मोबाईल फोनचा वापर - ३८०
अवैध इन्शुरन्स - २३७८
सिग्नल मोडणे - १९४
अवैध प्रवासी वाहतूक - ३
रिफ्लेक्टर नसलेले - ९१६
इतर कारवाई - ३८७९
एकूण - १०७१३

वायूवेग पथकामार्फत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीत सात महिन्यात दहा हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. आरटीओच्या ताफ्यात नऊ अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने असून २० अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत.
- राहूल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी आरटीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.