मेट्रोच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त ठरेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

 पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गांवरील पहिल्या टप्प्याच्या मेट्रोच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त ‘महामेट्रो’ने गुलदस्तात ठेवला आहे. यापूर्वीचे दोन मुहूर्त हुकल्यामुळे आता काम पूर्ण झाल्यावरच बघू, अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

पुणे - पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गांवरील पहिल्या टप्प्याच्या मेट्रोच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त ‘महामेट्रो’ने गुलदस्तात ठेवला आहे. यापूर्वीचे दोन मुहूर्त हुकल्यामुळे आता काम पूर्ण झाल्यावरच बघू, अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड- स्वारगेट मार्गावर आणि वनाज-रामवाडी मार्गावर काही अंतरावर मेट्रो धावणार आहे. त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या दोन्ही मार्गांवरील मेट्रो गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत धावेल, असे ‘महामेट्रो’ने सूतोवाच केले होते. त्यानंतर २६ जानेवारीच्या मुहूर्ताचीही चर्चा होती; परंतु, हे दोन्ही मुहूर्त हुकले आहेत. दोन्ही मार्गांवर मेट्रोचे काम जोरात सुरू असले तरी सिग्नलिंग, केबल वायरिंग, ट्रॅक आदींच्या निविदा प्रक्रियेला विलंब झाला; तसेच काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने विलंब झाला. पिंपरी-स्वारगेट मार्गावर मेट्रोची नुकतीच चाचणी झाली; परंतु ती १.४ किलोमीटरच झाली. उर्वरित ट्रॅकचे काम अजूनही सुरू आहे; तसेच वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गावरही ट्रॅकसह अनेक कामे अद्याप व्हायची आहेत. त्यामुळे मार्चअखेर मेट्रो धावेल का, याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दोन्ही मार्गांवर एकूण चार स्थानके व्हायची आहेत. तेथे तिकीट यंत्रणेपासून सरकते जिने बसवायचे आहेत. स्थानकांचे बांधकामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मेट्रो नेमकी कधी धावेल, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

 दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्यातील मेट्रो लवकरच धावेल. प्रकल्प मोठा असल्यामुळे मेट्रो कधी धावेल, हे आत्ताच सांगणे शक्‍य होणार नाही; परंतु कामे व्यवस्थित सुरू आहेत. 
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri to Fugewadi and wanaj to Garaware College Metro final stage