

पिंपरी, ता. २० ः शहरातील गणेश मंडळांनी यंदा धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे विविध देखावे उभारले आहेत. सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक गणेशभक्तांनी देखावे पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी रात्री शहरातील विविध भागांत गर्दी केली. रविवारी मध्यरात्री उशीरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. स्टॉलवरही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना खवय्ये दिसून आले.
पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरात दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतींची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. गणेशमूर्तीसह मंडप, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्यस्थितीवर आधारित आरास, देखावे उभारण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी यंदा सामाजिक संदेश देणारे विविध देखावे सादर केले आहेत. मंडळांनी सायबर क्राइम, श्री जगन्नाथ रथ, स्वामी समर्थ आराधना, श्रीराम मंदिर, श्री बालाजी मंदिर, भगवान विष्णूचे दशावतार, शिवरायांची मिरवणूक, श्रीकृष्ण महल, कुरुक्षेत्र, कालिया मर्दन, नरसिंह अवतार, महाराष्ट्राची लोकधारा यासह विविध जिवंत देखावे साकारले आहेत. देखावे पाहण्यासाठी विविध कानाकोपऱ्यांतून भाविक पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत अनेकांनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली. सायंकाळनंतर गर्दी वाढताना दिसून आली. गणेश मंडळांच्या भोवती खाद्यपदार्थ, खेळणी, विविध साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल मांडले होते. स्टॉलवरही नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. काही गणेश मंडळांनी पिण्याच्या पाण्याची आणि खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे पाहायला मिळाले. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग देखावे पाहण्यासाठी आले. युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आली. गणेश भक्तांच्या सोयीसाठी मेट्रो आणि पीएमपी सेवा सुरू असल्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.