पालिका शाळांत अध्यापनाचा प्रश्न

पालिका शाळांत अध्यापनाचा प्रश्न
Published on

ज्ञानेश्‍वर भंडारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची बरीच मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मंजूर १,५२२ पैकी शिक्षकांची ३९६ पदे रिक्त आहेत. मानधनावरील शिक्षकांची नियुक्ती केली जात असली, तरी त्यांच्यावर कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या सोपविता येत नसल्याने समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

तात्पुरती व्यवस्था
महापालिका मानधनावर शिक्षक नेमते. मात्र, ही व्यवस्था तात्पुरती असते. मानधनावरील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणे सर्व प्रशासकीय व शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपविता येत नाहीत. त्यामुळे उपलब्ध कायमस्वरूपी शिक्षकांवर अतिरिक्त ताण येतो. याशिवाय, मानधनावरील शिक्षकाने नोकरी अर्धवट सोडल्यास विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडतो. नव्या शिक्षकाच्या नियुक्तीपर्यंत अध्यापनाची जबाबदारी अन्य शिक्षकांवर सोपवावी लागते. परिणामी विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे.

अशैक्षणिक कामांचाही भार
पदे रिक्त असतानाच कार्यरत शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्याचा परिणाम वर्गातील अध्यापनावर होतो. विविध शासकीय उपक्रम, सर्वेक्षणे, निवडणूकविषयक कामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे तासिका कमी होतात.

गुणवत्तावाढीबरोबर शिक्षकांचीही गरज
महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, विविध शैक्षणिक उपक्रम आणि पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, वर्गात शिकविण्यासाठी आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसतील, तर या सुविधांचा अपेक्षित परिणाम साधणे कठीण आहे. त्यामुळे मानधनावरील तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी शिक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सातत्य कायम ठेवण्यासाठी प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
-----
दृष्टिक्षेपात
विभाग
विभाग - मंजूर पदे - कार्यरत - रिक्त
प्राथमिक मराठी - १,०७३ - ८०२ - २७१
प्राथमिक उर्दू - १५९ - ८९ - ७०
प्राथमिक हिंदी - २७ - १२ - १५
------------------
प्राथमिक एकूण १,२५९ - ९०३ - ३५६
---------------
माध्यमिक - २६३ - २२३ - ४०
एकूण- १,५२२ - १,१२६ - ३९६
--------------
आमचे विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये आहेत. मात्र, शिक्षकच कमी आहेत. त्यातच त्यांना एसआयआर, जनगणना अशी कामे लावली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याबाबत शाळा व्यवस्थापनाशी बोलले तर तेही हतबल आहेत. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर ते शासकीय कामांकडे बोट दाखवतात. विद्यार्थ्यांच्या नुकसानाची जबाबदारी कोणीच घेत नाही.
- एक पालक
---------------

महापालिकेच्या प्राथमिक विभागात १ हजार २५९ शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९०३ शिक्षक कार्यरत असून ३५६ पदे रिक्त आहेत. माध्यमिक विभागात २६३ शिक्षक पदे मंजूर असून २२३ पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदांवर मानधनावरील शिक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच रिक्त जागांची पवित्र पोर्टलवरही नोंदणी केली आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com