जुनी सांगवीत १८ मीटर रस्त्याचा मार्ग मोकळा
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. ६ : जुनी सांगवीतील बोपोडी रस्त्याला जोडणारा नवीन पूल ते शितोळे पेट्रोल पंप असा १८ मीटर (६० फूट) रुंद व एक किलोमीटर लांबीचा ‘डीपी’ रस्ता विकसित करण्यासाठी भूसंपादन सुरू केले आहे. या साठी महापालिकेने विशेष भूसंपादन अधिकारी, स्पेशल युनिट २, पिंपरी यांच्याकडे ८६ कोटींची भरपाई रक्कम जमा केली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या स्पायसर रस्त्यावरील वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याला समांतर असा सिमेंट काँक्रीट रस्ता विकसित करण्यात येणार आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या बांधकामाला वेग येणार आहे. नव्या १८ मीटर डीपी रस्त्यामुळे शितोळे पेट्रोल पंपाकडून नवीन पुलाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. सध्या शितोळे पेट्रोल पंप रस्ता, मुळानगर, जयमालानगर, पवनानगर, संगमनगर तसेच परिसरांतील काही जागा हस्तांतरित नसल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण जाणवत आहे. दररोज सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या भागांत सतत वाहतूक कोंडी होते. तसेच शितोळे पेट्रोल पंप ते संगमनगर परिसरांत दोन व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना प्रवासासाठी दुप्पट वेळ खर्चावा लागतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
वाहतूक व्यवस्थेत सुधारणांची अपेक्षा
या रस्त्याचा फायदा केवळ जुनी सांगवीपुरता मर्यादित राहणार नाही. नवी सांगवी, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. तसेच औंध, बाणेर आणि पुणे शहराशी जोडणी अधिक गतिमान होणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
नवीन पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
जुनी सांगवी-बोपोडी जोडणारा नवीन पूल रोषणाईने सजविण्यात येत असून तो पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावरील प्रमुख ‘लँडमार्क’ ठरत आहे. मुळा नदीकाठी उभारलेला हा पूल सध्या सांगवीतील नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि ‘मिनी पिकनिक स्पॉट’ म्हणून लोकप्रिय झाला आहे. संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिक कुटुंबासह येथे फेरफटका मारताना आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसतात.
सदर भूसंपादन प्रकरणाचा मसुदा मंजूर झालेला आहे. २४ जानेवारी २०२३ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार त्यामध्ये आवश्यक बदल करून फेरप्रक्रिया आवश्यक आहे. सध्या कार्यालयात न्यायालयीन प्रकरणांचा ताण असल्यामुळे या प्रक्रियेस काहीसा वेळ लागत आहे. मागील आठवड्यात संबंधित रक्कम जमा झालेली असून, त्यानंतर कामकाज सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण करण्यासाठी किमान महिनाभर लागण्याची शक्यता आहे.
- उषा विश्वासराव, विशेष भूमी संपादन अधिकारी
प्रस्तावित ६० फुटी रिंग रोड गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. अतिक्रमणे, न्यायप्रविष्ट प्रकरणे आणि भरपाईचे मुद्दे यामुळे काम रखडले आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा रस्ता लवकर पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.
- राजू मोरे, स्थानिक नागरिक
प्रस्तावित रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कायदेशीर प्रक्रियेमुळे काम पुढे सरकत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता लवकर पूर्ण करावा.
- मनीष मोहिते, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

