दापोडी-निगडी बीआरटीला अडथळ्यांची शर्यत 

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 8 जानेवारी 2018

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी मार्गाला विरोध केला असून महापालिका आयुक्त व आयआयटी पवईच्या तज्ज्ञ पथकाने या मार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळे दापोडी-निगडी मार्गावर बीआरटी बससेवा केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे. 

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी मार्गाला विरोध केला असून महापालिका आयुक्त व आयआयटी पवईच्या तज्ज्ञ पथकाने या मार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळे दापोडी-निगडी मार्गावर बीआरटी बससेवा केव्हा सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे. 

ग्रेडसेपरेटर उभारणीचा उद्देश 
पुणे-मुंबई जुन्या महामार्गाने विनाअडथळा जाता यावे व शहरांतर्गत वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने महामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दापोडी ते निगडीदरम्यान ग्रेड सेपरेटर उभारणी महापालिकेने केली. त्यानंतर बीआरटी योजना मंजूर झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून आलेला निधी या रस्त्यासाठी उपयोगी पडला. 

बीआरटी लेनची वाटचाल 
ग्रेड सेपरेटर आणि सेवा रस्ता यांमध्ये दोन्ही बाजूला बीआरटीसाठी स्वतंत्र लेन आखण्यात आल्या. त्यांची कामे पूर्ण होत आल्यानंतर 2011-12 मध्ये त्याबाबत सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यात आले. काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. बीआरटी मार्गावरील सुरक्षिततेचे उपाय सुचविण्यासाठी आयआयटी पवई संस्थेला 2013 मध्ये सांगण्यात आले. त्यांनी अहवाल दिला. 

तज्ज्ञांकडून पाहणी 
बीआरटी मार्गावरील स्थानके अद्ययावत करण्यासाठी व सुरक्षिततेचे उपाय करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गेले सात-आठ महिने विशेष प्रयत्न केले. शुक्रवारपर्यंत (ता. 5) त्यांनी बीआरटी मार्गावरील सर्व उपाययोजना पूर्ण केल्या. आयआयटीच्या पथकाने शनिवारी (ता. 6) या मार्गाची पुन्हा पाहणी केली. पुढील आठवड्यात ते पुन्हा पाहणी करणार आहेत. 

न्यायालयीन आदेशाची प्रतीक्षा 
आयआयटी पवईच्या पथकाच्या अहवालात सुरक्षिततेविषयी आणखी काही उपाय सुचविल्यास त्याचीही अंमलबजावणी करण्याची तयारी महापालिकेने ठेवली आहे. या पथकाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानंतर दापोडी-निगडी मार्गावर बीआरटी बससेवा सुरू होईल. 

बीआरटीचे महत्त्व 
दापोडी-निगडी बीआरटी मार्ग सुरू झाल्यास आणि त्याला जोडून पुणे महापालिकेने बोपोडीपासून पुणे स्टेशन अथवा शिवाजीनगरपर्यंत बीआरटी मार्ग उभारल्यास देशातील शहरांमधील गर्दीच्या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा म्हणून या बीआरटीचा लौकिक होईल. 

मुख्य आक्षेप... 
- ग्रेड सेपरेटर व सेवारस्ता यांच्यामध्ये बीआरटी मार्ग आहे. तो क्रॉस (मर्ज इन-आउट पंचिंगची ठिकाणी) करताना अपघाताची शक्‍यता 
- अनेक ठिकाणी सब-वे (भुयारी मार्ग) आहेत. त्यातून जाण्यासाठीही बीआरटी मार्ग ओलांडावा लागणार असल्याने अपघात होण्याची भीती 
- सब-वेतून पादचारी, विद्यार्थी मार्ग ओलांडतात, त्यांची सुरक्षितता कशी पाळणार 
- दापोडी हॅरिस पुलापासून खडकी कॅंटोन्मेंट व पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाताना बीआरटीची सोय नसल्याने अडचण 

सब-वेतील उपाययोजना 
- बीआरटी मार्गाच्या कडेला लोखंडी रेलिंग 
- सब-वेजवळ बीआरटी व सेवारस्त्यासाठी स्वतंत्र सिग्नल 
- सब-वेतील पदपथाच्या समपातळीमध्ये स्पीड रबेल (गतिरोधक) 
- रात्री गतिरोधक दिसण्यासाठी प्रकाश व्यवस्था 
- बस थांब्यापासून सब-वेपर्यंत पादचाऱ्यांना जाण्यासाठी स्वतंत्र रेलिंग 
- वाहने दिसण्यासाठी बहिर्वक्र आरसे बसविले 

"मर्ज इन-आउट'जवळील उपाय 
- थर्मोप्लास्ट पेंटिंगमध्ये रम्बेल्ड स्ट्रीप लावल्याने चालक वेग नियंत्रित करणार 
- मर्ज इन-आउटचे दिशादर्शक फलक 
- फायबरचे गतिरोधक 
- सेवारस्त्यावर मर्ज इन-आउट पूर्वी पट्टे रंगविणार 
- प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रक वॉर्डन 

चौकांतील उपाययोजना 
- बीआरटी व सेवारस्त्यासाठी स्वतंत्र सिग्नल 
- झेब्रा क्रॉसिंग 
- वाहतूक नियंत्रक वॉर्डनची नियुक्ती 
- बस थांबा ते चौकादरम्यान पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र रेलिंग 
- प्रत्येक चौकात रिफ्यूज एरिया (मोकळी जागा) 
- विविध दिशादर्शक फलक 
- बीआरटी बससाठी प्राधान्यक्रमाने सिग्नल. 

दृष्टिक्षेपात दापोडी-निगडी मार्ग 
लांबी : 12.5 किलोमीटर 
रुंदी : 61 किलोमीटर 
बस थांबे : 36 
बस मार्ग : 13 
बसगाड्या : 235 
बस फेऱ्या : 2200 
वेळा : सकाळी 5.30 ते रात्री 11.30 
सध्याचे प्रवासी : सुमारे 1 लाख 
अपेक्षित प्रवासी : 1.80 लाख 

ग्रेड सेपरेटर व सेवारस्त्यातील मर्जिंग इन-आउट 
निगडीकडून दापोडीकडे जाताना : 12 
दापोडीकडून निगडीकडे जाताना : 13 

एकूण चौक (सात) 
- भक्ती-शक्ती, निगडी 
- टिळक चौक, निगडी 
- खंडोबा माळ, आकुर्डी 
- शिवाजी चौक, चिंचवड स्टेशन 
- महावीर चौक, चिंचवड स्टेशन 
- अहल्यादेवी होळकर चौक, मोरवाडी 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी 

"टी पॉइंट'ची ठिकाणे (तीन) 
- नाशिक फाटा कासारवाडी 
- फुगेवाडी 
- सीएमई, दापोडी 

सब-वे (सहा) 
- आकुर्डी 
- काळभोरनगर 
- वल्लभनगर 
- कासारवाडी 
- कुंदननगर 
- फुगेवाडी 

रस्त्यावर मर्जिंग इन-आउट आणि सब-वे येथे अपघात होण्याची शक्‍यता आहे. सब-वेतून विद्यार्थी व पादचारी मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची उपाययोजना केल्याशिवाय बीआरटी सेवा सुरू करण्यास आमचा विरोध आहे. 
- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती, महापालिका 

बीआरटी सेवा सुरू करणे आवश्‍यक आहे. बीआरटीमुळे जलद वाहतूक होईल. दुचाकीस्वारांनी बीआरटीचा वापर सुरू केल्यास रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. सुरक्षिततेचे उपाय योजून बीआरटी बससेवा सुरू केल्यास नागरिकांना फायदा होईल. 
- नितीन काळजे, महापौर 

दापोडी-निगडी मार्गावर बीआरटी बससेवा सुरू करणार आहोत. स्थायी समिती अध्यक्षांनी सुरक्षिततेचा मुद्दा मांडला आहे. तोही महत्त्वाचा आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजल्यानंतर या मार्गावर बीआरटी बससेवा सुरू केल्यास शहरातील नागरिकांची चांगली सोय होईल. 
- एकनाथ पवार, सभागृह नेते 

सुरक्षिततेचे उपाय योजल्यानंतरच उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यात येईल. त्यांच्या परवानगीने बीआरटी सुरू केली जाईल. सार्वजनिक वाहतूक सक्षम केली तरच वाहतुकीच्या समस्येतून सुटका होईल. केवळ रस्ते आणि उड्डाण पूल बांधून वाहतुकीची समस्या सुटणार नाही. बीआरटीचे जाळे शहरात निर्माण झाल्यास नागरिकांना जलद आणि सुरक्षित सेवा मिळेल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news BRT PCMC Dapodi-Nigdi BRT