रसरशीत फळांमुळे उन्हाळा होतोय सुकर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पिंपरी - वाढत्या उन्हाने शहरवासीय हैराण झाले असून, ‘गर्मी में भी थंडी का एहसास’ देणाऱ्या रसदार फळांची मात्र रेलचेल आहे. एरवी उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसरशीत फळे यंदा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांच्या खरेदीला शहरवासीयांनी प्राधान्य दिले आहे. ‘स्वस्त आणि मस्त’ असलेल्या या फळांनी लगडलेल्या हातगाड्या, टेंपो आणि स्टॉल पावलोपावली पाहायला मिळत आहेत.

केरळ, कर्नाटकातून अननसांची आवक होते. यंदा समाधानकारक पीक आल्याने हातगाड्यांवर अननसांचे ढीग लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पन्नास रुपये नगाने मिळणारे हे अननस तीस रुपयांत मिळत आहेत. लहान आकारातील अननसांची किंमत वीस रुपयांना तीन अशी आहे. टरबुजांचीही मोठी आवक झाल्याने त्याचे भावही तीस ते चाळीस रुपयांवर आले आहेत. कुंदन, केशा, गोरिया, बॉबी, रायपूर, ‘शुगर किंग’, ‘बेबी  शुगर’या जातींचे टरबूज बाजारात उपलब्ध आहेत. कुंदन आणि ‘शुगरकिंग’जातीचे टरबूज गोड असल्याने त्याला मागणी अधिक असल्याचे मुन्ना पाल यांनी सांगितले. 

नाशिकच्या द्राक्षांनीही बाजारात आपले स्थान कायम ठेवल्याने त्यालाही मागणी आहे. ६० ते ८० रुपये किलो दराने ती विकली जात आहेत. रामफळानेही बाजाराचा ताबा घेतला असून, ८० ते १०० रुपये किलो दराने त्याची जोमात विक्री सुरू आहे. संत्री व मोसंबीलाही मोठी मागणी आहे.

आंब्यांची दुकाने ओस
नागरिकांना प्रतीक्षा असलेला अस्सल देवगड अथवा रत्नागिरी हापूस आंबा हव्या तितक्‍या प्रमाणात बाजारात दाखल झालेला नाही. सध्या त्याच्या किमतीही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. त्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. तुलनेने स्वस्त असलेले कलिंगड, खरबूज, अननस, संत्री, मोसंबी आदी फळांनाच ग्राहक पसंती देत आहेत. दुसरीकडे आंब्याचा हंगाम सुरू झाला असतानाही त्याची दुकाने मात्र ओस पडली आहेत. किरण, सुगरकिंग, बेंगळुरी कलिंगडाची शहरात मोठी आवक झाल्याचे दिसून येत आहे. मडगावहून आलेले कलिंगड वीस रुपयांपासून दीडशेपर्यंत आहेत. शहरात पिंपरी उड्डाण पुलाखाली मोठा फळबाजार भरतो. चिंचवड गावातही फळांचे अनेक स्टॉल आहेत. त्याव्यतिरिक्त चौकाचौकांत रस्त्यावरही फळविक्रीची दुकाने आहेत. या दुकानांत ग्राहकांची गर्दी दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात मागणी वाढल्याने विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती सुनील गायकवाड यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news fruit summer