प्राधिकरण बांधणार साडेसहा हजार घरे

मिलिंद वैद्य
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

परवडणारी घरे बांधणे हे आमचे उद्दिष्टच आहे. तीन वर्षांचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, टप्पाटप्प्याने ते पूर्ण केले जाणार आहेत. सामान्यांना योग्य दरात घरे उपलब्ध व्हावीत, हा हेतू आहे.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

पिंपरी - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येत्या तीन वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात साडेसहा हजार परवडणारी व मध्यम स्वरूपाची घरे बांधणार आहे. वेगवेगळ्या पेठांमध्ये सुमारे पंधरा प्रकल्प राबविण्यात येणार असून, तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. पंधरापैकी वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० व ३२ मधील ७९२ घरांचा प्रकल्प प्रगतिपथावर आहे, तर पेठ क्रमांक १२ मधील तीन हजार ४०० घरांसाठी कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) लवकरच देण्यात येणार आहे.

प्राधिकरणाच्या या प्रकल्पांमुळे आगामी तीन वर्षांत सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सोडत किंवा निविदा पद्धतीने या घरांचे वाटप करण्याचा प्राधिकरणाचा मानस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले.

अल्प उत्पन्न गट (एलआयजी), आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व मध्यम वर्गासाठी परवडणारी घरे बांधून देण्यासाठीच प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. या उद्देशाला अनुसरूनच हे पंधरा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहेत. सध्या सुरू असलेला वाल्हेकरवाडी प्रकल्प पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत आहे. वाल्हेकरवाडीचा प्रकल्प ४.८५ हेक्‍टरमध्ये उभारण्यात येत असून, पेठ क्रमांक बारामधील प्रकल्प ७.४७ हेक्‍टरमध्ये उभारण्यात येणार आहे. 

पेठ क्रमांक ३० व ३२, तसेच १२, ६, १, ४, ७, १० आणि २९ मध्ये हे गृहप्रकल्प होणार आहेत. यातील पेठ क्रमांक ६ मध्ये १७  रो-हाउस बांधण्यात येणार आहेत, तर भोसरीतील पेठ क्रमांक १ मध्ये अल्प उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटासाठी २२२ घरे बांधण्यात येणार आहेत. उर्वरित ठिकाणी अल्प उत्पन्न गट व आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. पेठ क्रमांक १२ वगळता बहुतांश प्रकल्पांसाठी वास्तुविशारद नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे २१.४९ हेक्‍टर जागा लागणार आहे. 

या पंधरा प्रकल्पांबरोबरच प्राधिकरणाकडून रचनात्मक विकासही सुरू आहे. ज्यामध्ये उद्याने, क्रीडांगणे, मंडई, रस्ते, उड्डाण पूल, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे. निवासी बांधकामांबरोबर चिखली व भोसरी येथील जिल्हा केंद्राच्या जागाही भविष्यात विकसित केल्या जाणार आहेत. शिवाय, व्यावसायिकदृष्ट्या आरक्षित जागाही विकसित करण्यात येणार आहेत.

Web Title: pimpri pune news 6500 homes making by pradhikaran