भूखंड लिलावाला विक्रमी बोली

मिलिंद वैद्य
शुक्रवार, 23 मार्च 2018

कोटीच्या कोटी ‘उड्डाणे’
पेठ क्रमांक १८ मधील अवघ्या १२८ चौरस मीटर क्षेत्रफळ अलेल्या भूखंडाला सर्वाधिक म्हणजे ६६ लाख ८४ हजार ४१६ रुपये भाव मिळाला. प्रति चौरस मीटर ५२ हजार २२२ रुपये इतका म्हणजे चौपटीहून जास्त विक्रमी दर मिळाला. जिथे प्राधिकरणाचा अपेक्षित दर प्रति चौरस मीटर १२ हजार ७० रुपये होता. काही भूखंड कोटींच्या घरात विकले गेले आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने प्रदीर्घ कालावधीनंतर बोलाविलेल्या भूखंड लिलावाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, ग्राहकांनी अपेक्षित दरापेक्षा चौपट दराने भूखंड घेण्याची तयारी दर्शविली आहे. १३ मार्चच्या पहिल्या टप्प्यातील लिलावासाठी दोन हजार १५६.२ चौरस मीटरच्या दहा भूखंडांसाठी साडेआठ कोटी रुपये प्राधिकरणाला मिळणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात अकरा भूखंड ई-निविदा लिलावाद्वारे ९९ वर्षांच्या कराराने दिले जाणार आहेत. हे सर्व रिकामे भूखंड पेठ क्रमांक ४ व १८ मधील आहेत. त्याची अंतिम सोडत बुधवारी जाहीर झाली असून, त्याला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचेही खडसे यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (भू-विभाग) प्रशांत पाटील म्हणाले, ‘‘अकरापैकी पेठ क्रमांक चारमध्ये असलेल्या भूखंड क्रमांक ८५-अ ला प्रतिसाद मिळाला नाही. या भूखंडाचे क्षेत्रफळ ३७२ चौरस मीटर आहे. भूखंड क्रमांक ३६८ हा अनुसूचित जमाती घटकांसाठी राखीव असून, त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या टप्प्यातील या दोन्ही भूखंडांसाठी ई-निविदा भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.’’

दुसऱ्या टप्प्यासाठी मुदतवाढ
दुसऱ्या टप्प्यातील भूखंडांसाठी १९ मार्चपर्यंत निविदा भरता येणार होत्या. परंतु, सोडतीला आणखी प्रतिसाद मिळावा व जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी होता यावे, यासाठी दुसऱ्या टप्प्याला दहा दिवसांची मुतदवाढ देण्यात आली आहे. ही ई-निविदा आता ३१ मार्चपर्यंत भरता येईल. त्यानंतर त्याची अंतिम सोडत जाहीर केली जाईल, असे खडके म्हणाले. दुसऱ्या टप्प्यातही वेगवेगळ्या पेठांमधील १२ भूखंड आहेत.

Web Title: pimpri pune news land auction rate