

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे गुरुवारी (ता. २०) सकाळी साडे दहाच्या सुमारास खासगी शाळेच्या स्कूल बसला (एमएच १४, सीडब्ल्यू ०७७१) अचानक आग लागली. या बसला स्कूल व्हॅनचा परवाना नसतानाही बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर आणि परिसरात सुमारे साडेचार ते पाच हजार शालेय वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात आहे. शहरात शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थांची वाहतूक सुरू आहे. वैध योग्यता प्रमाणपत्र नाही, वाहनांमध्ये परिचालक, अग्निशमन यंत्रणा नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. गुरुवारी (ता. २०) स्कूल बस ३५ विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत असताना काळाखडक परिसराकडे जात असताना भूमकर चौकात बसला आग लागली. या बसचे ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ची (पीयूसी) मुदत जूनमध्ये संपली आहे. बसचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार असून, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी जून २०२६ तारीख होती. पण, बस मालकाने अद्याप योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केलेले नाही. या बसला कर्मचारी आणि कामगारांची ने-आण करण्याचा परवाना असताना या बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरू होती. तरी देखील आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी या बसवर कोणतीही कारवाई केली नाही. गुरुवारी दुर्घटना घडल्यानंतर आरटीओ प्रशासनाला जाग आली असून, त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताबाबत प्रश्न...
- बसला शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बससारखा पिवळा कलर असतत्रा्नार आरटीओने या बसला योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) दिले कसे?
- दुर्घटना होईपर्यंत आरटीओने वाहनांची तपासणी का नाही केली?
- शाळा व्यवस्थापनाने या बसचे कागदपत्र तपासले का नाहीत?
- कागदपत्रात दोष असताना शाळेने विद्यार्थी वाहतुकीस परवानगी दिलीच कशी?
- या दुर्घटनेला आरटीओबरोबर शाळा व्यवस्थापन जबाबदार नाही का?
दुर्घटनाग्रस्त बसमधून विद्यार्थी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असून, शाळेला आणि संबंधित बसमालकाला नोटीस देण्यात येणार आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- अश्विनी स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.