

पिरंगुट, ता. २५ : पिरंगुटला एमआयडीसीत सुमारे अडीचशे औद्योगिक कारखाने आहेत. येथील उद्योगांना वीज, पाणी, रस्ते आदी प्रमुख मूलभूत सुविधांसाठी या कंपन्यांना ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावे लागत आहेत. मात्र ग्रामपंचायत आणि पीएमआरडीएला कर मिळण्याशी मतलब आहे. इतरवेळी या कंपन्यांचे काही घेणे देणे नाही, अशी परिस्थिती आहे.
ग्रामपंचायत आणि पीएमआरडीए या दोन संस्थांनी कंपन्यांच्या सुविधांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, पीएमआरडीए अथवा एमआयडीसी यांपैकी कुणीच या कंपन्यांची दखल घेत नसल्याने ‘ना घरका ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. परिणामी मूलभूत सुविधांअभावी इथल्या कंपन्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
खड्डेमय रस्ते
बहुतांश कंपन्यांतील अंतर्गत रस्ते खड्डेमय आहेत. गेल्या सुमारे वीस ते बावीस वर्षांपासून या रस्त्यांची अद्याप डागडुजीही केलेली नाही. काही ठिकाणी तर सुमारे एक मीटरहून लांब आणि दीड फूट खोलीचे खड्डे असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
चार-चार दिवस वीज गायब
सध्या वीज पुरवठा अपुरा आहे. रहिवासी आणि कंपन्यांसाठी एकच फिडर असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. औद्योगिक कारणासाठी घेतलेल्या फिडरवरच घरगुती वीज पुरवठ्याची जोडणी आहे. त्यामुळे एकदा वीज गेली की चार-चार दिवस गायब होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. येथे पथदिव्यांची कमतरता आहे.
कंपनीमालक हैराण
पिण्याच्या पाण्याबाबत काही कंपन्यांनी विंधन विहिरी खोदल्या आहेत. त्यातील पाणी शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे उपलब्ध केलेले आहे. काही कंपन्यांनी कंत्राटे देऊन सीलबंद बाटल्यांतून पिण्याचे पाणी उपलब्ध केलेले आहे. मुळशी योजनेचे पाणी अद्याप कंपन्यांपर्यंत पोचलेले नाही. वापरासाठी मोठ्या कंपन्यांनी पाटबंधारे विभागाशी करार केले असून त्यांना मुळा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्यात येथील बहुतांशी कंपन्यांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचा खर्च जास्त होत असल्याने कंपनीमालक हैराण झाले आहेत.
सांडपाणी, कचऱ्याचा बोजवारा
मोठ्या कंपन्यांनी स्वतःचे मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारलेले आहेत. मात्र छोट्या कंपन्यांत सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे या छोट्या असलेल्या सर्व कंपन्यांनी मिळून एक सामुहिक मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. तसेच मोठ्या कंपन्यांमध्ये औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा आहे. मात्र काही कंपन्या अद्यापही घाट रस्त्यात अथवा मोकळ्या निर्जन जागी कचरा फेकतात.
सुरक्षितता रामभरोसे
पिरंगुट परिसरात आता पोलिस ठाण्याच्या बावधन आणि पौड अशा दोन हद्दी तयार झाल्या आहेत. त्यामुळे काही दुर्घटनांच्यावेळी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था कंपन्याची झाली आहे. बावधन पोलिसांनी या भागात पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे.
अग्निशमन केंद्र कार्यान्वित नाही
मुळशीसाठी कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. अद्यापही आगीच्या घटनांच्यावेळी पुणे , हिंजवडी येथील केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. पिरंगुट परिसरातील कंपन्यांना पुणे येथील नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्रावर अवलंबून राहावे लागत असल्याने तेथून गाडी पिरंगुटला यायला सुमारे तासाभराहून अधिक वेळ जातो.
मुळशी इंडस्ट्रिअल क्षेत्रामधील सुविधांची सद्यस्थिती समाधानकारक नाही. अंतर्गत व मुख्य रस्त्यांची अवस्था खराब असून वाहतूक नियंत्रण व्यवस्थाही अपुरी पडत आहे. परिसरातील सुरक्षितता, पथदिवे, सीसीटीव्ही व्यवस्था अपुरी आहे. पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे.
सतीश करंजकर, अध्यक्ष, मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशन
येथील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने कामगार सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत अथवा पीएमआरडीएने येथील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-गजानन शितोळे कामगार , एमएफएस ग्रुप
ग्रामपंचायत व पीएमआरडीए या दोन्हीही संस्थांनी येथील सुविधांसाठी एकत्रित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
-संदेश सुर्वे, कार्यकारिणी सदस्य, भारतीय कामगार सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.