esakal | खड्ड्यांमुळे पालटले आमुचे नशीब...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

खड्ड्यांमुळे पालटले आमुचे नशीब...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड-सकाळ वृत्तसेवा

मा. महापौरसाहेब, मा. आयुक्तसाहेब

सप्रेम नमस्कार!

विषय ; महापालिकेच्या कृपेने व्यवसाय जोरात चालू असल्याने आभार मानण्याबाबत.

साहेब, मी एकेकाळचा गरीब हाडवैद्य असून, दोन वेळच्या अन्नालाही महाग होतो. मात्र, जेव्हापासून मी पुण्यात स्थलांतरित झालो, तेव्हापासून माझे नशीबच पालटले. यामागे महापालिकेची कृपा आहे, याची मला नम्र जाणीव आहे.

साहेब, पुण्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असतात. त्यामुळे प्रवास करताना पुणेकरांची हाडे अक्षरशः खिळखिळी होतात. त्यामुळे माझा व्यवसाय कितीतरी पटीने वाढला आहे. आमच्याकडे पेशंटची एवढी रांग लागलेली असते, की पहाटे चारपासून ते रात्री अकरापर्यंत मी उपचार करत असतो. एवढे दिवस- रात्र मेहनत करूनही पेशंटची संख्या काही कमी होत नाही. उलट ती वाढतच आहे.

साहेब, माझे वडीलही दुसऱ्या शहरात हाडवैद्य होते. मात्र, त्यांचा व्यवसाय फारच मंदीत होता. वर्षातून दोन-तीन पेशंटवर ते उपचार करायचे. त्यामुळे लहानपणी आमचे फार हाल झाले. मी मोठा झाल्यावर हा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. पण मलाही वर्षभरात तीन-चार पेशंट मिळायचे. माझी ही परिस्थिती पाहून मला कोणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नव्हते. मात्र, एक सद् गृहस्थाने मला पुण्याला स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आणि माझे नशीबच पालटले.

सुरवातीला पुण्यातील एका झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या खोलीत सुरू केलेला हा व्यवसाय आता पाच मजली आलिशान इमारतीत स्थलांतरित केला आहे. यामागे मी हाडाची काडे करून व्यवसाय वाढवला, हे खरे कारण नसून, महापालिकेची कृपादृष्टीच अधिक आहे, याची मला सातत्याने जाणीव आहे. या व्यवसायाच्या जोरावर मी पंधरा हजार फुटांचा आलिशान बंगला बांधला असून, ‘खड्ड्यांची पुण्याई’ असे त्याचे नामकरण केले आहे.

काही दिवसांपूर्वी मी रस्त्याचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे गेलो होतो. मी कोणीतरी विरोधी पक्षाचा कार्यकर्ता वा पत्रकार आहे, असा त्याचा समज झाला असावा. ‘‘जा. जा. तुम्हाला काय करायचं ते करा. मी कोणाला घाबरत नाही. आमचेही हात वरपर्यंत पोचलेत.’’ असे म्हणून त्याने आम्हाला ‘हाड-हाड’ केले. त्यावेळी मी हळूच खिशातून एक लाख रुपयांचे पाकीट त्याच्या हातावर ठेवले. ‘‘साहेब, तुम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर लगेचच मोठ मोठे खड्डे पडतात.

तुम्ही बुजवलेले खड्डे दोन-दिवसांत पुन्हा उखडतात. त्यामुळे तुम्हीच आमच्या व्यवसायाचे तारणहार आहात. तुमच्या कृपेनेच माझ्यासारखा हाडवैद्य पैशांच्या राशीत लोळतोय. तुमच्या उपकाराची परतफेड म्हणून मी फूल ना फुलाची पाकळी देत आहे.’’ मी दिलेले एक लाखांचे पाकीट बघून, तो आश्‍चर्यचकित झाला. त्याने मला आदराने बसायला सांगितले.

‘‘वैद्यसाहेब, आम्हीच दुसऱ्यांना पाकिटे देत असतो. आम्हाला कोण देणार पाकीट? पण तुम्ही आठवणीनं दिलंत, याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. तुमच्या व्यवसायाची आणखी भरभराट होवो,’’ अशा शुभेच्छा त्याने दिल्या. मी तत्काळ ‘हे तुमच्याच हातात आहे,’ असे म्हटले. हाडांचा व्यवसाय नीट चालावा, यासाठी ठेकेदारासारखी अशी अनेक माणसं मी जोडली आहेत.

साहेब, हाडांवर मी उपचार करतो. मात्र, माझ्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही. त्यामुळे तुमचे काही अधिकारी मला दमदाटी करतात, तुरुंगांत डांबण्याची धमकी देतात, अशावेळी ‘गांधीबाबा’च मदतीला धावतात.

ता. क. ; माझ्या व्यवसायाच्या भरभराटीस हातभार लावणारे रस्त्यांचे ठेकेदार, अधिकारी व इतरांवर आयुष्यभर हाडांसंबंधीत उपचार मोफत करण्याची घोषणा मी आज करत आहे.

- सु. ल. खुटवड (९८८१०९९०९०)

loading image
go to top