गोयलांनी मांडला ‘भारत’ नावाचा ब्रँड

गोयलांनी मांडला ‘भारत’ नावाचा ब्रँड
Published on: 

गोयलांनी मांडला ‘भारत’ नावाचा ब्रँड
सम्राट फडणीस ः सकाळ न्यूज नेटवर्क
द हेग (नेदरलॅंड्स), ता. २६ : सात दशकांपूर्वी समुद्र नेदरलॅंड्सच्या उंबरठ्यावर आला होता. डच लोकांनी समुद्राच्या दयेची वाट पाहिली नाही. त्यांनी डेल्टा वर्क्सचे बांध आणि संरक्षक कवचे उभी केली आणि निसर्गाला शब्दशः शिस्त लावली. याच कथेचा धागा पकडून केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी हेगमधील व्यासपीठावरून भारताचे विकासचित्र रंगविले आणि नेदरलॅंड्सच्या उद्योगविश्‍वाला सरळ प्रस्ताव दिला : ‘भारतासोबत या.’
भारत-नेदरलॅंड्स बिझनेस फोरमच्या उद्‍घाटन सत्रात गोयल बोलत होते. नेदरलॅंड्सचे परराष्ट्र व्यापार व विकास सहकार्य मंत्री स्जूर्ड स्जूर्ड्समा आणि नेदरलॅंड्समधील भारताचे राजदूत कुमार तुहिन व्यासपीठावर होते. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्राचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी फोरमसाठी उपस्थित होते. कसलेल्या सीईओने गुंतवणूकदारांसमोर आपल्या कंपनीचे सादरीकरण करावे, तसे गोयल यांनी ‘भारत’ नावाच्या महाकाय कंपनीचे ब्रँडिंग केले.

विकासाची भागीदारी
नेदरलॅंड्स लोकसंख्येने लहान, पण समृद्ध आहे. त्याच्याकडे तंत्रज्ञानाचे बळ आणि सधन दरडोई उत्पन्न आहे. भारत लोकसंख्येने, आकाराने मोठा आणि तरुण आहे. त्याला पुढे जाण्याची भूक आहे. दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. ते एकमेकांच्या विकासात भागीदारी करू शकतात, असे गोयल यांनी सांगितले.
भारतीयांच्या कष्टाळू वृत्तीची मांडणी डचांसमोर करताना गोयल म्हणाले, ‘भारतात कुणी तुम्हाला संध्याकाळचे पाच वाजल्याची आठवण करून देत नाही, आणि आठवड्याच्या सुट्टीची तर नाहीच नाहीं.’
स्वतःसाठी, मुलांसाठी आणि कुटुंबासाठी चांगल्या जीवनमानाची आस असलेली ही तरुणाई भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे इंधन आहे. ही प्रतिभावान तरूणाई अखंड काम करते आहे, असे गोयल म्हणाले.
महिलांना घरकामाच्या चौकटीतून बाहेर पडून औपचारिक रोजगारात उतरायचे आहे. जवळपास प्रत्येक घरातल्या तरुणाच्या हातात स्मार्टफोन आहे. बाजारपेठेतील मागणी जोर धरते आहे ती यामुळेच, असे त्यांनी सांगितले.

१३० अब्ज डॉलरचा पाया
या मागणीला पायाभूत सुविधांचा भक्कम आधार देण्यासाठी भारताने १३० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असल्याचे गोयल यांनी सांगितले. २०१४ नंतर विमानतळांची संख्या झपाट्याने वाढली आणि महामार्ग व द्रुतगती मार्गांचे जाळे जवळपास दुप्पट झाले. देशाची ऊर्जाक्षमता सध्या सुमारे ५२० गिगावॉट आहे. ती पुढील सात-आठ वर्षांत सुमारे एक हजार गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यातील मोठा वाटा स्वच्छ ऊर्जेचा असेल. सौर, अणू, जल आणि हरित हायड्रोजन अशा स्रोतांच्या मिश्रणातून स्वस्त व विश्वासार्ह वीज उपलब्ध होईल. डेटा सेंटरसारख्या उद्योगांसाठी ही मोठी संधी आहे, असे गोयल यांनी नमूद केले.
विश्‍वासाचा मुद्दा त्यांनी थेट मांडला. ‘आम्ही डेटा चोरत नाही, तंत्रज्ञान चोरत नाही, कल्पना चोरत नाही,’ असे सांगत भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचा दावा त्यांनी केला.

नियमांच्या जंजाळावर टोला
युरोपमधील नियामक ओझ्यावर बोलताना गोयल यांनी उद्योगजगताची नस पकडली. ‘हे बोललो की मी उद्योजकांचा लाडका होतो,’ असे ते म्हणाले. उद्योगांना कमी निर्बंध, सोप्या प्रक्रिया आणि अधिक मोकळीक हवी आहे, असे सांगत भारत अशा सुधारणांसाठी उद्योगांकडून सूचना घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

७.५ टक्क्यांचा विश्वास
जगभरात अनिश्चितता असतानाही भारत हा सर्वाधिक वेगाने वाढणारा मोठा देश आहे, असे गोयल म्हणाले. गेल्या वर्षी विकासदर ७.७ टक्के राहिला आणि पुढील काळातही तो ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘व्हॅन गॉगचा क्षण गमावू नका’
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही बाजूंची बाजारपेठ अधिक खुली होईल, असे सांगत गोयल यांनी डच उद्योगांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. भाषणाचा शेवट त्यांनी महान चित्रकार व्हिन्सेन्ट वॅन गॉगच्या उदाहरणाने केला. वॅन गॉगची चित्रे त्याच्या हयायीत उपेक्षित राहीली आणि त्याच्या मृत्यूनंतर या चित्रांना अफाट किंमत लाभली. वॅन गॉग मोमेन्ट, असे याला अलिकडच्या काळात म्हटले जात आहे. भारत - नेदरलॅंड्स व्यापार हा वॅन गॉग मोमेन्ट आहे. या भागीदारीची क्षमता ज्यांना आधी ओळखता येईल, त्यांनाच सर्वाधिक फायदा होईल. त्यामुळे आपला व्हॅन गॉगचा क्षण गमावू नका,’ असे आवाहन गोयल यांनी उद्योग जगताला केले.

भारत - नेदरलॅंड्स व्यापार-उद्योगांच्या संधींची क्षेत्रेः

सेमीकंडक्टर
हरित हायड्रोजन
सागरी क्षेत्र
अन्नप्रक्रिया
पाणी व्यवस्थापन
स्मार्ट शहरे
कृत्रिम बुद्धिमत्ता
नवीकरणीय ऊर्जा
शेती
औषधनिर्मिती
वैद्यकीय तंत्रज्ञान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Piyush Goyal
piyush goyal
piyush goyal
piyush goyal
Marathi News Esakal
www.esakal.com