Induri Fort and Koteshwar Temple : पुणे परिसर दर्शन : इंदुरी किल्ला आणि कोटेश्वर मंदिर

तळेगाव ते चाकण रस्त्यावर इंदुरी नावाचे छोटे गाव आहे. या गावाला लागूनच एकदम छोटासा इंदुरी किल्ला आहे.
Koteshwar Temple
Koteshwar Templesakal

तळेगाव ते चाकण रस्त्यावर इंदुरी नावाचे छोटे गाव आहे. या गावाला लागूनच एकदम छोटासा इंदुरी किल्ला आहे. याचा दरवाजा उत्तम स्थितीत आहे, त्यावर दोन शरभ शिल्प आहेत. शरभ हा काल्पनिक प्राणी आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचे कार्य पूर्ण झाल्यावर म्हणजे हिरण्यकश्यपूला मारल्यावर त्याच्या उग्र अवताराचा इतरांना त्रास होऊ लागला म्हणून, त्याला मारण्यासाठी शंकराने शरभ या प्राण्याचा अवतार घेतला आणि नरसिंहाचे अवतार कार्य समाप्त केले, अशी एक कथा आहे.

असा हा शरभ आपल्याला अनेक किल्ले तसेच मंदिरांच्या प्रवेश द्वारावर दिसतो. कधी त्याच्या पायाखाली आणि सोंडेत वाघ, सिंह किंवा हत्ती असतात. त्याचे शरीर सिंहासारखे आणि मुख पक्षासारखे असते. असे दोन शरभ इंदुरीच्या मुख्य द्वारावर आहेत. त्यांच्या मधोमध एक सुंदर पण छोटंसं देवीच शिल्प आहे. असे देवीचे द्वारशिल्प सहसा इतर ठिकाणी बघायला मिळत नाही. दरवाजावर छोटासाच पण सुंदर नगारखाना आहे.

Koteshwar Temple
MP Dr. Amol Kolhe : बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवणार

आतल्या कमानींवर जुन्या चित्रांचे काही शिल्लक अंश दिसतात, कमानींची रचना पण सुंदर आहे. किल्ल्यावर नऊ बुरूज आहेत, ते सगळे खाली दगडी आणि वरच्या बाजूला विटांचे बांधकाम असलेल्या तटबंदी ने जोडले आहेत. पण, आता बरीच झाडे वाढल्याने तटावरून फेरफटका मारता येत नाही. गडाच्या आत काडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या एका बाजूला इंद्रायणी नदीचे विस्तृत पात्र आहे. हा किल्ला संवर्धनाची वाट पाहात आहे.

१७२०-२१ मध्ये हा किल्ला सरसेनापती खंडोजीराव येसाजीराव दाभाडे यांनी बांधला. खंडोजीरावांनंतर त्यांच्या पत्नी आणि एकमेव स्त्री सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी किल्ला ताब्यात ठेवला. त्यांच्यानंतर त्यांचे जावई आणि मोरोपंत पिंगळे यांचे चिरंजीव यशवंतराव मांडे यांच्याकडे किल्ल्याचा ताबा आला. ‘सरसेनापती दाभाडे गादी’ असे याला संबोधले जात होते.

या किल्ल्याच्या जवळच नदी किनारी एक छोटेसे शंकराचे मंदिर आहे. कोटेश्वरवाडी गावात असलेल्या कोटेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली आहे. मंदिर जरी छोटेसे असले तरी त्याच्या समोरच इंद्रायणी नदीचे पात्र आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी वहात असल्यामुळे अतिशय सुंदर दृश्य दिसते. तसेच उन्हाळ्यात सुद्धा अत्यंत थंड वाटते.

काय पहाल?

प्रवेशद्वार, त्यावरचे देवीचे द्वारशिल्प, शरभ शिल्प, काडजाई देवी मंदिर, कोटेश्वर मंदिर.

कसे पोहचाल

तळेगाव दाभाडेहून इंदुरीला बस ने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com