Palasnath Temple : पुणे परिसर दर्शन : पळसदेव वाजवळील पळसनाथ मंदिर

उन्हाळा आला की पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळ इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींची एकच गर्दी होते.
Palasnath Temple
Palasnath Templesakal
Summary

उन्हाळा आला की पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळ इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींची एकच गर्दी होते.

उन्हाळा आला की पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळ इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींची एकच गर्दी होते. कारण, उजनी धरणाच्या साठ्याचे पाणी कमी झाल्यावर तिथे असलेल्या पळसदेव गावाच्या जवळच असलेले पळसनाथ मंदिर. एरवी पाण्यामध्ये बुडालेले हे मंदिर पाणी कमी झाल्यानंतर दिसायला लागते आणि अनोखे, विलोभनीय असे त्याचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते.

पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून बोटीने जावे लागते. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधले आहे. साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे. स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती, त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य हे सहाव्या-सातव्या शतकात सत्तेवर होते आणि बसवकल्याण इथे असलेले कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर होते.

पळसनाथ मंदिरात आता शंकराची पिंड नाही आणि पाण्यामुळे मंदिराची बरीचशी झीज झालेली आहे; पण तरी पाण्यातील हे मंदिर अत्यंत विलोभनीय दिसते. नीट बघितले की या मंदिराची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झाल्याचे लक्षात येते. अशाच दुरुस्तीवेळी कधीतरी चुण्यात तयार केलेले एक ‘शरभ शिल्प’ इथे दिसते. तसेच मंदिराच्या कळसाचीही दुरुस्ती झालेली आहे आणि तो नव्याने बांधलेला आहे, असे दिसून येते.

या मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीराम मंदिर आहे. या मंदिरावर रामायणातील प्रसंग कोरलेले आढळतात. राम मंदिर पळसनाथ मंदिरापेक्षानंतर बांधले आहे. साधारण पंधराव्या शतकात बांधले असावे. उन्हाळ्यात या मंदिरात पायी जाता येते. पळसदेव गावात काही मंदिरे आहे. अगदी नवीन बांधलेल्या मंदिरांजवळ पुरातन जैन प्रतिमा आढळतात. त्यामुळे पळसदेव हे गाव बरेच जुने असावे.

प्रचंड मोठा पाण्याचा फुगवटा असलेले उजनी धरण १९८० मध्ये बांधून पूर्ण झाले. भीमा नदीमधून वाहून येणारे पाणी अडवणे असा या धरणाचा उद्देश होता. थंडीपासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून भिगवणजवळ बरेच स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच भोरड्या म्हणजे रोझी स्टारलिंग या पक्षांचा आभाळात होणारा विलक्षण विहार ज्याला ‘मरमरेशन’ असे म्हणतात, तो पाहता येतो. काही पक्षी स्थलांतर करून येतात, त्यातले काही आता इथेच वर्षभर राहताना आढळतात.

उथळ पाण्यामुळे इथे फ्लेमिंगो पक्षी बऱ्याच संख्येने येतात. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चाल, लांब सडक मान आणि त्यांचे उडणे या सर्व गोष्टी अतिशय रुबाबदार आणि प्रेक्षणीय असतात. भोरड्या साधारण ऑगस्ट सप्टेंबरकडे पूर्व युरोप आणि पश्चिम मध्य आशियातून येतात. या पक्षांना मधुसारिका, पळस मैना अशी नावे आहेत. खूप जास्त संख्येने असलेला त्यांचा कळप आकाशात विविध आकार करीत उडत असतो. त्यांचे ते विहरणे पाहणे हा अत्यंत वेगळाच आणि आनंददायी अनुभव असतो.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

काय पहाल?

पळसनाथ मंदिर, राम मंदिर, त्यावरील कोरीव काम, उजनी धरणातील स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी.

कसे पोहचाल

पुणे ते सोलापूर रस्त्यावर एसटीने पळसदेवला जाऊन तेथून जीपने किंवा पायी नदीकाठी जाता येते. नदीकाठापासून बोटीने मंदिरापर्यंत जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com