Sangmeshwar Changwateshwar Temple : पुणे परिसर दर्शन : संगमेश्वर, चांगवटेश्वर मंदिर

कऱ्हा आणि चांबळी किंवा भोगावती नदीच्या संगमावर बांधलेले संगमेश्वर मंदिर हे अत्यंत रमणीय परिसरातील सुंदर मंदिर आहे.
Sangmeshwar Temple
Sangmeshwar Templesakal
Summary

कऱ्हा आणि चांबळी किंवा भोगावती नदीच्या संगमावर बांधलेले संगमेश्वर मंदिर हे अत्यंत रमणीय परिसरातील सुंदर मंदिर आहे.

सासवड या पुण्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या गावाला मोठा इतिहास आहे. इथे सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे. सासवड हे त्यांना इनाम मिळालेले गाव होते. बाळाजी विश्वनाथ हे पेशवे होण्याआधी सरदार पुरंदरे यांच्याकडे कामाला होते. नंतर ते शाहू महाराजांचे पेशवे झाले तरीही सासवड येथून ते कारभार पाहत असतं. बाजीराव पेशवे पण सुरवातीची १० वर्षे इथूनच कारभार पाहत होते. अशा या सासवडला बरीच महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यापैकी संगमेश्वर आणि चांगवटेश्वर ही दोन मंदिरे शांतता आणि पावित्र्याची अनुभूती देणारी आहेत.

कऱ्हा आणि चांबळी किंवा भोगावती नदीच्या संगमावर बांधलेले संगमेश्वर मंदिर हे अत्यंत रमणीय परिसरातील सुंदर मंदिर आहे. जांभळी नदीवरून जाण्यासाठी लोखंडी पूल बांधला आहे. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. वरती प्रशस्त आवारामध्ये दगडी मंदिर बांधलेले दिसते. भव्य नंदी आणि छान कोरीव काम असलेले स्तंभ असा मंदिराचा अंतराळ आहे. हे मंदिर कधी बांधले याचा उल्लेख सापडत नाही तरी पेशवाईमध्ये किंवा त्याआधी याची दुरुस्ती आणि बांधकाम झाले असावे. मंदिरावर आणि आतमध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

भव्य नंदी आणि अंतराळात कासव कोरलेले असून गाभाऱ्‍याच्या प्रवेशद्वाराचे उत्तम कोरीव काम आणि शांत थंडाव्यामध्ये असलेली शंकराची पिंड असे दर्शन घेऊन आवारात आल्यावर सर्व बाजूंनी नदीचे दर्शन होते. या मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूलाही शंकराची दोन मंदिरे आहेत. आवारात चांगल्या स्थितीतील दीपमाळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असे बांधलेले तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाच्या खालच्या कोनाड्यामध्ये एक शिवलिंग आहे. त्यामुळे तुळशीला पाणी दिले की आपोआपच शिवलिंगावर अभिषेक होतो. मंदिरासमोरच सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी आहे आणि थोड्याशा अंतरावर पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचे सुद्धा समाधी स्मारक आहे.

जवळच सरदार पुरंदरे यांचा वाडा आहे. हा वाडा बाहेरून बघण्यासारखा आहे. तटबंदी आणि प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे. हा वाडा शनिवार वाड्याच्या आधीपासून बांधलेला आहे. इथूनच नारायणपूरकडे जायला लागल्यावर चांगवटेश्वर किंवा चांगावटेश्वर मंदिर आहे. चांगदेवांनी स्थापन केलेले मंदिर अशी याची आख्यायिका आहे. त्यामुळे त्याला चांगवटेश्वर असे नाव पडले असावे. सुंदर कोरीव खांब, भव्य नंदी, दोन्ही मंदिरात नंदीवर गळ्यात घंटाच्या माळा कोरल्या आहेत आणि या माळा बांधलेली दोराची गाठ आता रॉक क्लाइंबिंगमध्ये दोन दोर जोडायला वापरतात, तशीच कोरलेली आहे. या दोन मंदिरांबरोबरच गावात सोपानदेवांची समाधी आहे. तसेच इतरही काही मंदिरे आहेत.

काय पहाल?

संगमेश्वर मंदिर, सरदार गोदाजी जगताप यांची समाधी, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समाधी स्मारक, चांगवटेश्वर मंदिर, पुरंदरे वाडा, सोपानदेव यांची समाधी.

कसे पोहचाल

पुण्याहून बसने सासवडला जाऊन तिथून रिक्षाने या सर्व ठिकाणांना भेट देता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com