
पाषाणजवळ सोमेश्वरवाडी हे एक पुरातन शिवमंदिर राम नदीच्या किनाऱ्यावर बांधलेले आहे. असे म्हणतात ९०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. हेमाडपंथी बांधकाम असलेले हे मंदिर साडेतीन एकर जागेत उभे आहे.
जिजाऊसाहेब आणि बाल शिवराय येथे दर्शनासाठी येत असतं; तसेच पेशव्यांचेही हे आवडते ठिकाण होते. स्वयंभू पिंड असलेले हे मंदिर आता नव्याने दुरुस्त केले आहे. पण प्रशस्त आवार, दगडी सीमाभिंत, उंच वृक्ष यामुळे मंदिरात प्रसन्न वाटते. मंदिरात शिवपिंडीव्यतिरिक्त हनुमान, गणेश आणि काळभैरवनाथ मंदिर आहे. तसेच एक यज्ञ मंडपही आहे. ४० फुटांची एक दीपमाळ शोभून दिसते.
मुख्य मंदिरात जमिनीवर संगमरवर लावून दगडी बाज कमी केला आहे. मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंग मंदिरांच्या सुंदर प्रतिकृती केलेल्या आहेत. सात ते दहा फूट उंच आणि हुबेहूब मूळ मंदिराप्रमाणे, प्रमाणबद्ध प्रतिकृती अगदी त्या मंदिरासमोर उभे असल्याचा आभास निर्माण करतात. सोमेश्वर मंदिराच्या मागे राम नदीचे पात्र आहे आणि जवळच एक जिवंत झरा वाहतो. नदी पात्रामध्ये एक पुष्करणी आहे, पात्र थोडे स्वच्छ असण्याची गरज आहे.
मंदिराशेजारी महापालिकेने ग्राम जीवन उद्यान तयार केले आहे. यात ग्रामजीवन देखावे आणि पुतळ्यांच्या साथीने दाखवले आहे. पुतळे अगदी जिवंत वाटतात. ग्रामीण जीवनातील रोजच्या प्रसंगांना इथे जिवंत केलंय. पारावर बसलेले लोक, शेती, नांगरणी, बारा बलुतेदार असे प्रसंग छानच जमलेत. या उद्यानाला प्रवेश शुल्क आहे. पुण्याच्या अगदी जवळ आणि वेगळाच अनुभव देणारी ही सोमेश्वरवाडी तुम्हाला नक्की आवडेल.
काय पहाल?
सोमेश्वर मंदिर, गणेश, हनुमान, भैरवनाथ मंदिर, वेदमूर्ती शिवराम भट चित्राव संजीवन समाधी, यज्ञ मंडप, ४० फूट दीपमाळ, बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्या प्रतिकृती, ग्रामजीवन उद्यान.
कसे पोहचाल
सोमेश्वरवाडीला बसने जाता येते.
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.