चोपडज ग्रामपंचायत खरेदी करणार प्लॅस्टिक कचरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

गटविकास अधिकारी देणार पैसे
पहिल्या दिवशी खरेदी केलेल्या कचऱ्याचे पैसे गटविकास अधिकारी प्रमोद काळे स्वतः देणार आहेत. ‘‘चोपडज गावाचा हा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनी त्यातून प्रेरणा घ्यावी’’, असे त्यांनी सांगितले.

वडगाव निंबाळकर - गावातील प्लॅस्टिक कचरा ग्रामपंचायतीने खरेदी करावा, असा निर्णय बारामती तालुक्‍यातील चोपडज येथील महिला ग्रामसभेत घेण्यात आला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सरपंच अश्विनी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महिलांची ग्रामसभा झाली. यामध्ये ग्रामसेविका रंजना आघाव यांनी विषय वाचन केले. गावातील प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या दूर करण्याबाबत चर्चा झाली. प्लॅस्टिक बंदी करावी, याबाबत सर्वांचे एकमत झाले. गावात सध्या असलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे. हा कचरा ग्रामपंचायतीने खरेदी केला तर अधिक प्रतिसाद मिळेल. ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा कचरा पंधरा रुपये किलो, तर कमी जाडीचा कचरा ३० रुपये किलो दराने खरेदी करावा, असे सर्वानुमते ठरले. ३१ डिसेंबरपासून कचरा गोळा करण्याचा निर्णय झाला. हा कचरा एका कंपनीला देण्यात येणार आहे. याच्या खर्चाबाबत सामाजिक संस्थांशी बोलणी झाली आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत पुढे आली आहे. प्लॅस्टिकच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिक स्वयंशिस्तीने प्लॅस्टिक टाळतील असा विश्वास वाटतो, असे ग्रामसेविका रंजना आघाव यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा सिधये यांच्या प्रेरणेतून आम्ही हा निर्णय घेतल्याचे सरपंच गाडेकर यांनी सांगितले. 

कन्यारत्न झालेल्या मातेचा पाचशे रुपयांचा धनादेश देऊन सन्मान केला जाईल, असेही या सभेत ठरले. सन्मानाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला होईल. एक जानेवारीपासून हा उपक्रम चालू करण्यात येईल. गावातील विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये रुपाली भोसले, सीमा रसाळ, संजीवनी देशमुख, आनंदाबाई कारेकर यांच्यासह सुमारे शंभर महिला उपस्थित होत्या. 

बुधवारी सकाळी दुसरी ग्रामसभा झाली. यामध्ये दोन्ही विषयांना मंजुरी देण्यात आली. या वेळी मारुती कोळेकर, देविदास गाडेकर, राजेंद्र गाडेकर, संतोषकुमार भोसले, समीर गाडेकर, प्रवीण गाडे, बाळासाहेब पवार, संदीप गाडेकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plastic garbage purchase by grampanchyat chopdaj