
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात कडक पोलिस बंदोबस्त
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता व अन्य महत्वाच्या रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ठिकठिकाणी पोलिसांचे समूह व निवडक पोलिस कर्मचारी मार्गावर बंदोबस्तवर आहेत. शहर पोलिस, राज्य राखीव पोलिसांसह केंद्रीय तपास संस्थाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कार्यक्रम ठिकाणाची कसुन तपासणी करण्यात येत आहे.
पुणे मेट्रो लोकार्पण, महापालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्याचे अनावरण, एमआयटी येथे सभा आणि लवळे येथील सिंबायोसिसमध्ये कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांकडुन कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मोदी यांचे सकाळी दहा वाजता विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्यानंतर ते हेलीकॉप्टरने शिवाजीनगरच्या सिंचन नगर येथील मैदानावर उतरणार आहेत. तेथून रस्ते मार्गाने महापालिका भवनात दाखल होऊन त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्याचे अनावरण होणार आहे. पुढे पुणे मेट्रो लोकार्पणनिमित्त ते गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकात येथून मेट्रोने आनंदनगरपर्यंत प्रवास करणार आहेत.
मार्ग व कार्यक्रम ठिकाणाना छावणीचे स्वरूप हजेरी लावतील
लोहगाव विमानतळ, विश्रांतवाडी, रेंजहिल्स परिसरातील सिंचननगर, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, महापालिका भवन, डेक्कन, गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, कर्वे रस्ता, पौड रस्ता, एमआयटी कॉलेज, सेनापती बापट रस्ता येथे पोलिसांचा रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून कडक बंदोबस्त आहे. विशेषत: लोहगाव विमानतळ, सिंचननगर, महापालिका भवन, गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, आनंदनगर मेट्रो स्थानक, एमआयटी कॉलेज येथे अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे. वाहतुक शाखा, पोलिस ठाणे, राज्य राखीव पोलिस दल, फोर्स वनच्या कंपन्या व २२०० पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात तैनात केला आहे
इमारतीवरुन टेहळणी, श्वान पथकांकडुन कसुन तपासणी
कार्यक्रम ठिकाणे व मार्गाजवळ असलेल्या ऊंच इमारती, मनोरे येथून पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहेत. ठिकठिकाणी बंदूकधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी बन्दोबत करीत आहेत. याबरोबर गुन्हे शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वानांकडून ठिकठिकाणी कसुन तपासणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी, केंद्रीय तपास संस्थाचे अधिकारीही रस्त्यावर
पंजाब येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांचे या बन्दोबस्तावर लक्ष आहे. त्यादृष्टिने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी रविवारी पहाटेपासूनच बंदोबस्तच्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर केंद्रीय तपास संस्थाचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधान यांचे विशेष सुरक्षा दल आदी विविध कार्यक्रम ठिकाणे व मार्गावर लक्ष ठेवून आहेत.
Web Title: Pm Narendra Modi Pune Police Alert Pune Metro
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..