पुण्यातील तरुणाच्या स्टार्टअपची यशोगाथा उलगडली पंतप्रधानांनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi Share success story of young man startup from Pune Mann Ki Baat

पुण्यातील तरुणाच्या स्टार्टअपची यशोगाथा उलगडली पंतप्रधानांनी!

पुणे : रविवारची सकाळ असल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील धायरीमध्ये राहणारे मिलिंद वडनेरे हे निवांत होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर नवी दिल्लीतील `स्टार्टअप इंडिया’ विभागाकडून कॉल आला. आजच्या मन की बात कार्यक्रमात तुमचा उल्लेख होणार आहे.... वडनेरे यांनी रेडीओ सुरू केला अन ‘मन की बात’मध्ये त्याच्या स्टार्टअपची यशोगाथा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच रविवारी सकाळी उलगडून दाखविली. मिलिंद यांनी १४ वर्षांची ‘आयटी़’मधील नोकरी सोडून ५ वर्षांपूवी बंधू कमलेश यांच्याबरोबर राहत्या घरात विज्ञान खेळणी सुरू करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि ‘फनव्हेंशन लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा जन्म झाला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत कमलेश यांचे निधन झाले. तरीही मिलिंद डगमगले नाहीत. केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’मध्ये त्यांनी नोंदणी केली.

त्यांचे स्टार्टअप सुरू झाले. सिंहगड रस्त्यावर नांदेड फाट्याजवळ पांडुरंग इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्यांचा कारखाना आहे. डोक्याला चालना देणाऱ्या खेळण्यांचे मिलिंद यांना लहानपणापासूनच आकर्षण होते. नोकरीचा कंटाळा आल्यावर आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्याचे त्यांनी ठरविले. कमलेश यांनीही त्यांना साथ दिली. सुरवातीला यू-ट्यूबवर व्हिडीओवर अपलोड करण्याचे मिलिंद यांनी उद्दिष्ट ठेवले होते. ते करताना ही खेळणी मुलांपर्यंत पोचण्यासाठी तयार करण्याचे त्यांनी ठरविले. खेळणी तयार करण्याचे साहित्य त्या सोबत देऊन मुलांनी खेळणी जोडावी, ही त्या मागची कल्पना. त्यातून १०० हून अधिक प्रकारची विज्ञान खेळणी त्यांनी तयार केली आहेत. गॅझेटसपासून ३ ते १६ वयोगटातील मुले दूर राहतील, त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, असा त्यांचा उद्देश आहे.

खेळणी तयार झाल्यावर विक्रीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म निवडला आणि पाहता पाहता त्यांनी तयार केलेली खेळणी मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरूसह अनेक शहरांत पोचली. दरम्यानच्या काळात कंपनीची उलाढालही ३ कोटींपेक्षा जास्त झाली आणि स्टार्टअप स्थिरावले. ‘स्टार्टअप इंडिया’च्या डिजीटल शो-केसमध्येही त्यांनी तयार केलेली खेळणी पोचली. देशातील ६५ हजार स्टार्टअपमधून १० स्टार्टअपला केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये दुबईत एका प्रदर्शनात भाग घेण्यासाठी पाठविले. त्यातही मिलिंद यांच्या ‘फनव्हेंशन’ची निवड झाली. तेव्हाच सगळीच माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचली होती. तिचा उल्लेख ‘आजच्या मन की बात’मध्ये होणार आहे, हे मात्र त्यांना रविवारी सकाळीच समजले.

मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांनी, काही वर्षांपूर्वी देशातील ८० खेळणी चीनवरून आयात होत. परंतु, ते प्रमाण आता अवघ्या १० टक्क्यांवर आले आहे कारण पुण्यातील ‘फनव्हेंशन लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड’सारख्या कंपन्या आता पुढे येऊन यशस्वी होत आहे, असे सांगितले.

सगळंच कसं आनंददायी !

या वाटचालीबद्दल ‘सकाळ’शी बोलताना वडनेरे म्हणाले, ‘‘मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी, या उद्देशाने आम्ही ‘फनव्हेंशन’ स्टार्टअप सुरू केले. ‘स्टार्टअप इंडिया’ने आम्हाला वेगवेगळ्या प्रदर्शनांत सहभागी होण्याची संधी दिली. त्यांच्या डिजीटल शो-केसमध्ये आमच्या उत्पादनांचा समावेश झाला, हे सगळंच आमच्यासाठी आनंददायी आहे. पंतप्रधानानांनी आज आमचा उल्लेख केल्याबद्दल खूपच आऩंद झाला असून आमच्या कष्टाचे चीज झाले आहे.’’

Web Title: Pm Narendra Modi Share Success Story Of Young Man Startup From Pune Mann Ki Baat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top