#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

विश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे. येथे अंघोळीच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून नागरिकांची गैरसोय होत आहे. 

विश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे. येथे अंघोळीच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून नागरिकांची गैरसोय होत आहे. 

विश्रांतवाडी येथील मौलाना आजाद स्मारकाच्या जवळ असलेल्या या स्मशानभूमीत येरवडा, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन, घोरपडी परिसरातील लिंगायत, गवळी, बंजारा आणि मादिगा या चार समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सध्या ही स्मशानभूमी समस्येच्या विळख्यात अडकली आहे. येथे सुरक्षारक्षक नसल्याने मद्यपींसाठी हे ठिकाण अड्डा बनले आहे. आसपासच्या परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकत असल्याने स्मशानभूमीचे रूपांतर कचरा डेपोत झाले आहे; तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या कोणत्याही साधनसामग्रीची, मनुष्यबळाची उपलब्धता नाही. मृत व्यक्तींना दफन करण्यासाठी मातीदेखील शिल्लक राहिलेली नाही; तसेच येथे अनेक ठिकाणी मृतांच्या सांगाड्याची हाडे बाहेर पडल्याचे पाहायला मिळतात.

स्मशानभूमीच्या नदीलगतची बाजू नदीपात्रात ढासळलेली आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठीची व्यवस्था नसल्याने तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते; तसेच येथे शौचालयाची व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.  यासंदर्भात अखिल मादिगा समाज सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कानडे व प्रदेशाध्यक्ष मनोज महादेव शेट्टी यांनी सांगितले,या स्मशानभूमीच्या दुरवस्थेची पुणे महापालिकाने त्वरित दखल घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात; अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

साधारण दोन लाख लोकांसाठी असणाऱ्या या स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यासाठी जागा खूप छोटी आहे. त्यामुळे दुसरा मृतदेह पुरताना आधी पुरलेल्या मृतदेहाची हाडे दिसतात. ही जागा म्हणजे व्यसनाधीन लोकांचा अड्डा बनली आहे. पोलिस अनेकदा मद्यपींना हटवतात. येथे झाडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे गैरसोय होते. 
- विशाल ओझर्डेकर, रहिवासी 

काटेरी झुडपे व सर्वत्र कचरा असल्याने येथे चालणेही अवघड झाले आहे. उताराचा भाग असल्याने मृतदेह पुरण्यासाठी चांगली जागा मिळत नाही. जिथे सपाट जागा आहे, तिथेच मृतदेह पुरावे लागतात. नदीच्या बाजूला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे जागा सुरक्षित नाही. यावर उपाययोजना व्हावी.
- भीमराव रामगोरे, रहिवासी, ताडीवाला रस्ता 

स्मशानभूमीत सांगाडे बाहेर आलेले नाहीत. पुणे महापालिकेतर्फे स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येथे सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वी डुक्कर होते, परंतु पंधरा दिवसांपूर्वी डुकरांवर कारवाई करण्यात आली. येथे सर्व सोयीसुविधा पुरविण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू 
आहे.
- लक्ष्मी गवारी, आरोग्य निरीक्षक, ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय.

Web Title: PMC Issue crematorium