#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अद्ययावत मशिनसाठी आवश्‍यक असणारा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम शिल्लक होते. त्यासाठी आवश्‍यक तो निधी आम्ही उपलब्ध करून दिला आहे. येथे लवकरच नवीन डीपी बसविण्यात येईल. महिनाभरात ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य जनतेसाठी सीटीस्कॅनसारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

पौड रस्ता - महापालिकेबरोबर करार होऊन दोन वर्षे झाली, तरी सुतार दवाखाना येथील सीटीस्कॅन मशिन अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना प्रचंड आर्थिक ताण आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डॉ. अभिजित मोरे म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेला स्वस्तात आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने महापालिकेने एका खासगी कंपनीबरोबर २०१७ मध्ये दहा वर्षांचा करार केला. त्यानुसार कोथरूड परिसरातील कै जयाबाई नानासाहेब सुतार मॅटर्निटी होम या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सीजीएस दराच्या सहा टक्के कमी दराने रेडिओलॉजी सेवा सुविधा पुरवण्याबाबत स्थायी समितीने मान्यता दिली. ४ जानेवारी २०१८ ला या कामाची वर्कऑर्डर निघाली; परंतु गेली दोन वर्षे झाले तरी सुतार दवाखान्यात अद्यापही एमआरआय व इतर सुविधा सुरू झालेल्या नाहीत. त्यासाठी लागणारी उपकरणे बसवण्यात आलेले नाहीत. जनता या सुविधांपासून वंचित आहे. या कंपनीवर अद्यापही कारवाई का करण्यात आली नाही?’  

अमोल बगाडे म्हणाले, ‘लोकांना कमी दरामध्ये रेडिओलॉजीची सुविधा उपलब्ध करून द्यावी; अन्यथा संबंधित करार रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. डॉ. अभिजित मोरे, प्रा. सुहास पवार यांनी त्यासंदर्भातचे निवेदन आयुक्त व आरोग्यप्रमुखांना दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.’

यासंदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, करारानुसार या मशिनसाठी लागणारा विद्युत पुरवठा महापालिकेने आम्हाला करून दिलेला नाही. त्यामुळे मशिन येऊन पडले आहे; परंतु वापरता येत नाही, अशी स्थिती झाली आहे.’

विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले, ‘मशिनसाठी आवश्‍यक असणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी रस्ता खोदून केबल टाकावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिने कालावधी लागेल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pmc Issue What is hidden under the Tarpaulin in sutar hospital