esakal | पुण्यात भाजप नगरसेवकाची दमदाटी; महिला अधिकाऱ्याला कोसळले रडू

बोलून बातमी शोधा

PMC Pune income increase Online income Tax filing

लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून आता नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे.

पुण्यात भाजप नगरसेवकाची दमदाटी; महिला अधिकाऱ्याला कोसळले रडू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून आता नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. केंद्र सुरू करण्यास अधिकारी प्रतिसाद देत नाही म्हणून भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना रडू कोसळले. त्यातून महापालिकेत एकच गोंधळ उडाला.

बुधवारी सायंकाळी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ‘नगरसेवकांकडून असे प्रकार होत असतील तर आम्ही काम कसे करणार,’ असा सवाल उपस्थित करीत, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ करण्याचा इशारा महापौरांना दिला.सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ महापालिकेत सुरू होता.

हेही वाचा: केडगावमध्ये ऑक्सिजन अभावी 3 जणांचा मृत्यू

महापालिकेत नाव समितीचे घोगरे हे अध्यक्ष आहे. त्यांच्या प्रभागात माजी महापौर प्रशांत जगताप यांनी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे घोगरे यांनीही लसीकरण केंद्रासाठी प्रस्ताव दिला होता. त्यासाठी आरोग्य विभागाकडे ते वारंवार पाठपुरावा करीत होते. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने आज दुपारी ते कार्यकर्त्यांसह आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याकडे गेले. डॉ. जाधव या दुजाभाव करत असून, फोन उचलत नाहीत, प्रस्तावाबाबत प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावेळी डॉ. भारती यांनी डॉ. जाधव यांना आपल्या कार्यालयात बोलावले.

डॉ. जाधव आल्यानंतर घोगरे यांनी थेट ‘तुम्ही काय काम करता, रात्री फोन केला तर उचलला नाही, दोन दिवस फाइल पाठवून झाले, झोपा काढता का?’ अशा शब्दात त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यामुळे संतापलेल्या डॉ. जाधव यांनीही ‘तुम्ही कामे करता तर आम्ही काय झोपा काढत नाही. आम्हालाही लोकांच्या जिवाची काळजी आहे. तुमची अरेरावी ऐकून घेण्यासाठी आम्ही तुमचे नोकर नाही. तुम्ही आम्हाला पगार देत नाही. अंघोळीला गेले तरी २० फोन येतात, प्रत्येक फोनला उत्तर कसे देणार,’ अशा शब्दात प्रतिउत्तर दिले.

हेही वाचा: पुण्यासाठी २५ हजार कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; आज लसीकरण केंद्र खुली

झालेला प्रकार चुकीचा आहे. मी अधिकाऱ्यांच्या बाजूने आहे. या प्रकाराबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे काम करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे अधिकाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार योग्य नाहीत. - रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त

लसीकरण केंद्र सुरू करण्याची मी मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उलट अनधिकृतपणे लसीकरण केंद्र चालविले जात आहे. म्हणून मी रीतसर विचारणा करण्यासाठी आरोग्य प्रमुखांकडे गेलो होतो. त्याबाबत आम्ही जाब विचारला. त्यातून आपली चूक समोर येईल, या भीतीने संबंधित अधिकाऱ्यांनी आकांड तांडव केला. आम्ही केवळ अधिकृत लसीकरण केंद्राचीच मागणी करत होतो. बाकी काहीच नव्हते. - धनराज घोगरे, नाव समिती अध्यक्ष

या प्रकाराबाबत अधिकारी आणि नगरसेवक घोगरे यांच्याशी चर्चा केली असून, दोघांनाही समज दिली आहे. मात्र, प्रशासन चुकीचे काम करत असल्यास ते सहन केले जाणार नाही. घोगरे यांनी चुकीच्या कामाला विरोध केला होता. त्यांना आवश्‍यक ती माहिती देणे प्रशासनाचे काम आहे. - मुरलीधर मोहोळ, महापौर