#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.

फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.

फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने पाणी व अन्य नागरी सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन पालिकेने दिले होते. सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या पालिकेबरोबर अनेक बैठका झाल्या मात्र आश्वासनानंतरही पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि अन्य महत्त्वाच्या नागरी समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी फुरसुंगी गावातील तसेच भेकराईनगर येथील पालिकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयाला ‘टाळे ठोको’ आंदोलन करत ही कार्यालये कुलूप लावून बंद करीत महापालिकेचा निषेध केला. अर्चना कामठे, दिनकर हरपळे, प्रवीण कामठे, रोहिणी राऊत, रणजित रासकर, राजाभाऊ सूर्यवंशी, विशाल हरपळे, उषा ढोरे, संजय हरपळे, किरण सरोदे आदींसह ग्रामस्थांनी आंदोलन केले.

ग्रामपंचायतच बरी होती
सध्या आम्हाला दहा ते पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळते. रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग पडले असून, अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या गाड्या रोज येत नाहीत, विहिरींवरील पाण्याच्या मोटारी बंद पडल्या, तर वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होत आहे. अन्य नागरी सुविधा देण्याकडेही पालिका लक्ष देत नाही. गाव पालिकेत घेताना ग्रामपंचायतीचा जमा झालेला सुमारे चार कोटींचा महसूल पालिकेने त्यांच्याकडे घेतला. शिवाय वर्षभरात गावातून पालिकेने सुमारे सहा ते सात कोटी महसूलही जमा केला. तरीदेखील पालिका गावाला आवश्‍यक नागरी सुविधा देत नाही. पालिका अधिकारी येथील कामांकडे काणाडोळा करतात. ग्रामपंचायतीत असतानाची परिस्थिती बरी होती, असे म्हणायची वेळ पालिकेने आमच्यावर आणली असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: PMCIssue Movement for Facilities in Fursungi