#PmcIssue खासगी प्रॅक्‍टीस करणारे डॉक्‍टर रडारवर 

दिलीप कुऱ्हाडे
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

येरवडा : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्‍टीस करीत असल्याचे उघड झाले असून, याची दखल घेऊन या विभागाने पावले उचलली आहेत. अशा डॉक्‍टरांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिला आहे. 

येरवडा : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्‍टीस करीत असल्याचे उघड झाले असून, याची दखल घेऊन या विभागाने पावले उचलली आहेत. अशा डॉक्‍टरांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिला आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागात 156 वैद्यकीय अधिकारी आहेत. महापालिका डॉक्‍टरांना लाखाच्या वर पगार देते. त्यांनी खासगी रुग्णालयात काम करू नये, शहरातील गरीब व गरजू रुग्णांना चांगली सेवा द्यावी, यासाठी त्यांना पगाराच्या तब्बल 35 टक्के "नॉन प्रॅक्‍टीसिंग अलाउन्स' दिला जातो. तरीही अनेक डॉक्‍टर नियमबाह्यपणे खासगी मोठ्या रुग्णालयांत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. यातील अनेक डॉक्‍टरांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास महापालिकेला अपयश आले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अनेक डॉक्‍टर खासगी रुग्णालयात किंवा स्वत:च्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यामुळे नोकरीला असलेल्या ठिकाणी (उदा. कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय) ते वेळेत न पोचल्याने रुग्णांचा जीव धोक्‍यात आल्याची प्रकरणे घडली. काही महिन्यांपूर्वी राजीव गांधी रुग्णालयात गर्भवती माता शुभांगी जानकर यांचा बाळासह मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले व सध्या निलंबित असलेले डॉ. विजय बडे दिघी येथील त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करायचे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी तंबी दिली होती. 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. अशा वेळी काही वैद्यकीय अधिकारी "नॉन प्रॅक्‍टीसिंग अलाउन्स' घेऊन खासगी रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

डझनभर डॉक्‍टर सतत गैरहजर 
महापालिकेत नोकरी करणारे व "नॉन प्रॅक्‍टीसिंग अलाउन्स' घेणारे वैद्यकीय अधिकारी स्वत:च्या व दुसऱ्यांच्या नावाने भोसरी, दिघी, हडपसर, वारजे, पिंपळे-गुरव आदी ठिकाणी असलेल्या रुग्णालयांत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. तर, तब्बल डझनभर डॉक्‍टर सतत गैरहजर असतात; मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PmcIssue private practitioner doctor on PMC radar