#PmcSchool आम्ही खेळ शिकावा कसा

PMC-School
PMC-School

पुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांत केवळ नावापुरताच क्रीडा शब्द राहिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या शाळांत क्रीडा प्रशिक्षकच उपलब्ध करून दिले गेले नाहीत. शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाला आठव्या वर्षीच ग्रहण लागले आहे. आकृतिबंधात या पदाची तरतूद नसल्याचे कारण देत प्रशासनाकडून प्रशिक्षक नियुक्त केले जात नाहीत. 

विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण मंडळाने २००९-१० मध्ये क्रीडा निकेतन शाळा हा उपक्रम सुरू केला. मंडळाकडे २०१६-१७ या वर्षापर्यंत शाळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. त्यानंतर महापालिकेकडे ही जबाबदारी आली. मंडळाकडे व्यवस्थापन होते, तेव्हा सुरवातीला अकरा प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती. २०१६-१७ या वर्षी बारा प्रशिक्षक कार्यरत होते. या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळू लागल्याने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य क्रीडा स्पर्धांत भाग घेऊन यश मिळविले होते. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाग घेतला. 

क्रीडा प्रकार 
कबड्डी, खो-खो, हॅंडबॉल, थ्रो बॉल, व्हॉलिबॉल, योगासन, कुस्ती, ॲथलेटिक्‍स, क्रिकेट, ज्यूदो, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरूपात मानधन तत्त्वावर दरवर्षी भरती प्रक्रिया राबविली जात होती. 

तरतूदच नाही
क्रीडा मार्गदर्शक पदाचा आकृतिबंधात समावेश नसल्याने या जागा एकवट वेतन किंवा करार पद्धतीने भरल्या जात होत्या. महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकातही क्रीडा प्रशिक्षकांसाठी तरतूद केली गेली आहे.

या क्रीडा निकेतन शाळा 
    ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडा निकेतन 
    (सिंहगड रस्ता) 
    भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रीडा निकेतन 
    (माळवाडी, हडपसर)
    मनपा शाळा क्रमांक १२७ क्रीडा निकेतन (येरवडा)

दोन वर्षांपासून क्रीडा प्रशिक्षक नाही. त्यामुळे कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शाळेतील शिपाईच देत आहेत. ज्या उद्देशाने क्रीडा निकेतन सुरू झाल्या आहेत, तो सफल होण्यासाठी प्रशिक्षकांची भरती झाली पाहिजे. 
- रघुनाथ गौडा, नगरसेवक 

माझी मुलगी क्रीडा निकेतनमध्ये चार वर्षांपासून शिकत आहे. सध्या तेथे फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळला जात आहे. या शाळांत गेल्या वर्षीपासून क्रीडा प्रशिक्षकच नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मी मुलींना चांगले प्रशिक्षक स्वतंत्ररीत्या देऊ शकत नाही किंवा दुसऱ्या क्रीडासंस्थेत पाठवू शकत नाही.
- आनंद चव्हाण, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com