प्रवासी पासला मुदतवाढ देण्याबाबत पीएमपीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

लॉकडाउन 22 मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांना पासचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे या पासला मुदतवाढ मिळावी, अशी प्रवाशांची मागणी होती.

पुणे : लॉकडाउनच्या काळातील पीएमपी प्रवाशांच्या विविध पासला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, त्यासाठी येत्या सात दिवसांत प्रवाशांना पास केंद्रावर जावून पासवर मुदतवाढीचे शिक्के मारून घ्यावे लागणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदी पीएमपीच्या मासिक पासचा वापर करतात. त्यासाठी आगाऊ पैसे भरून ते पास घेतात. परंतु, लॉकडाउन 22 मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांना पासचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे या पासला मुदतवाढ मिळावी, अशी प्रवाशांची मागणी होती. नुसार पासला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, 65 वर्षांवरील प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या वैधतेच्या पासचीही मुदतवाढ वाढवून दिली जाणार आहे.

राज्य ग्राहक आयोगातील दाव्यांना मार्चमधील तारखा; तक्रारदारांची चिंता वाढली​

स्वारगेट, महात्मा गांधी स्थानक, हडपसर, मनपा, डेक्कन, पुणे स्टेशन (मोलेदिना), विश्रांतवाडी, वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चौक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आणि सांगवी या पास केंद्रांवर प्रवाशांना प्रत्यक्ष जावे लागेल. पासच्या किंवा मी कार्डच्या प्रकारानुसार दहा सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 2 दरम्यान संबंधित अधिकारी पासवर शिक्के मारून मुदत वाढवून देणार आहेत. नागरिकांनी येत्या सात दिवसांतच पासची मुदत वाढवून घ्यावी, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असेही पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश​

पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांतील सुमारे दोन ते अडीच लाख प्रवासी पीएमपीच्या विविध प्रकारच्या पासचा वापर करतात. पासला मुदतवाढ मिळावी, म्हणून पीएमपी प्रवासी मंचच्या सदस्यांसह अनेक प्रवाशांनी मागणी केली होती. त्यावर अखेर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या बाबत प्रवासी दत्तात्रेय फडतरे म्हणाले, "शाळा, महाविद्यालय बंद आहेत. तर विद्यार्थ्यांच्या पासच्या मुदतवाढीचे काय? तसेच ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीमध्ये प्रवेश बंद आहे. तर त्यांच्या पासच्या मुदतवाढीचे प्रशासनाचे नियोजन काय आहे?

दोन्ही शहरांच्या हद्दीबाहेर बससेवा बंद आहे. तर त्या प्रवाशांच्या पासच्या मुदतवाढीचे काय? पासला मुदतवाढ घेण्यासाठी सात दिवस हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवाशांना सरसकट साठ ते नव्वद दिवसांपर्यंत पासला मुदतवाढ देणे गरजेचे आहे.'' पुढील काळात विशिष्ट दिवसांत पासचा वापर करण्याची सक्ती प्रवाशांवर करू नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP administration decided to extend validity of passengers passes