पीएमपी बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६ कोटी १७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

पुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६ कोटी १७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सीएनजी, बीआरटी, नॉन एसीच्या चारशे बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव या वर्षी मे महिन्यात मंजूर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रकियेस अधिकाधिक बस उत्पादकांकडून प्रतिसाद मिळावा यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती. तीन वेळा जाहीर निविदा मुदतवाढ देऊनही त्यास प्रतिसाद मिळाला नाही. 

या निविदेमध्ये सहभागी टाटा मोटर्स कंपनीने बीआरटीसाठी उपयुक्त असणाऱ्या ९०० एमएम फ्लोअर हाइट, ११-१२ मीटर लांबी, यूरो- ४, सीएनजी विथ आयटीएमएस, सात वर्षे आयटीएमएससह वॉरंटीसह प्रतिबससाठी सुमारे ४८ लाख ७९ हजार रुपये इतके दर सादर केले होते. टाटा मोटर्सबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुमारे ४८ लाख ४० हजार रुपये इतक्‍या दराने बस घेण्याचे मान्य करण्यात आले.

बैठकीनंतर माहिती देताना समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक म्हणाले, ‘‘पीएमपीएमएल संचालक मंडळातील ठरावानुसार पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या साठ टक्के म्हणजेच ४०० पैकी २४० बसेस खरेदीसाठी प्रतिबस ४८ लाख ४० हजार रुपये याप्रमाणे सुमारे १६६ कोटी १७ लाख रुपये पीएमपीएमएलला वर्ग करण्यात आले आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ७४ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. २४० बसेस खरेदीसाठी आवश्‍यक ११६ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम पीएमपीएमएलला टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’

विद्यार्थी मोफत पाससाठी साडेसात कोटी
महापालिका हद्दीतील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यासाठी पीएमपीएमएलला साडेसात कोटी अग्रिम देण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६ हजार ९२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत पासेससाठी तीन कोटी ९० लाख रुपये, तर खासगी शाळेतील पाचवी ते दहावीतील ६ हजार २४१ विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यासाठी तीन कोटी ५९ लाख रुपये असा एकूण १३ हजार १६४ विद्यार्थ्यांसाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पीएमपीच्या १३ डेपोंमधून हे पास वितरित करण्यात येणार आहेत, असेही मुळीक यांनी सांगितले.

Web Title: PMP approved bus purchase proposal