पुणे रेल्वे स्टेशनवरून पीएमपीची अहोरात्र बससेवा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

पुणे रेल्वे स्थानकावरून कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रांतवाडी, लोहगाव, हिंजवडी, वाकड, भोसरी, पिंपरी, निगडी, हडपसर, मुंढवा, कोंढवा, मार्केटयार्डसाठी बससेवा सुरू आहे.

पुणे - शहरातील पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये घरी जाण्यासाठी पीएमपीने अहोरात्र बससेवा सुरू केली आहे. त्यासाठी दोन्ही शहरांतील 15 मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. तसेच लोहगाव विमानतळासाठीही 5 बस गुरुवारपासून तैनात केल्या आहेत. 

राज्यात लॉकडाउन सुरू असला तरी, देशातील 200 मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू आहे. त्यातील 13 गाड्यांची वाहतूक दररोज पुण्यात होते. सुमारे 15 हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. तसेच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनीही या बाबत पीएमपीला सूचना केल्या होत्या. त्यानुसार रेल्वे स्थानकावरील बस वाहतुकीला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार बसचे नियोजन करण्यात आले आहे, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे रेल्वे स्थानकावरून कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रांतवाडी, लोहगाव, हिंजवडी, वाकड, भोसरी, पिंपरी, निगडी, हडपसर, मुंढवा, कोंढवा, मार्केटयार्डसाठी बससेवा सुरू आहे. त्यासाठी 70 रुपये तिकीट आकारले जात आहे. बसची माहिती प्रवाशांना व्हावी, यासाठी 3 तिकीट तपासनीस आणि काही कर्मचारी तैनात केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लोहगाव विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन सेंटरपर्यंत पोचविण्यासाठीही 5 बस तैनात करण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्टेशन आणि लोहगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यानुसार बसच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय बस प्रवासाबाबत अद्याप निर्णय होईना 
शहरात आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा सुरू आहे. त्यातून वैद्यकीय कारणासाठी प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. या बाबत सांगवीतील रहिवासी बाळासाहेब टण्ण म्हणाले, की मला वैद्यकीय उपचारांसाठी नियमितपणे स्वारगेट परिसरात यावे लागते. दरवेळी रिक्षा आणि कॅब परवडत नाही. सुरू असलेल्या बसमधून प्रवास करण्याची परवानगी द्यायला हवी. या बाबत वाघमारे  म्हणाले, की बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यांनी परवानगी दिल्यावर वैद्यकीय कारणांसाठी बस प्रवासाला परवानगी देता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP day and night bus service from Pune railway station