#PMPIssue पीएमपी कर्मचाऱ्यांकडून सौजन्य टांगणीला!

विकास कोठवळ 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - अर्धा-पाऊस तास भर पावसात पीएमपीची वाट पाहणारे प्रवासी... वेळापत्रकाचा उडालेला बोजवारा... अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या बस... अन्‌ प्रवाशांकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात मश्‍गूल असलेले अधिकारी व कर्मचारी... असे चित्र कात्रजमधील पीएमपी स्थानकात पाहावयास मिळाले.

या आगारातून उपनगरांसह पिंपरी-चिंचवडला पीएमपी बस सोडल्या जातात. यामुळे येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथे पीएमपीचे वेळापत्रक लावले आहे. मात्र, त्याचे पालन होत नाही. तसेच, ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे बस कधी लागली अन्‌ कधी गेली, हे प्रवाशांना समजत नाही. तसेच, पीएमपीच्या मागील दरवाजाजवळ पाटीही लावली जात नाही.

पुन्हा अतिक्रमण
कात्रज बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे काही महिन्यांपूर्वी काढली होती. त्यामुळे बस उभ्या राहण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होती. आता पुन्हा तेथे अतिक्रमणे झाली आहेत. खासगी वाहनेही स्थानकात उभी केली जातात.

अकरा वाजता ‘टी टाइम’
शिवाजीनगरकडे जाण्यासाठी गुरुवारी अकराच्या सुमारास अर्धा तास बस उपलब्ध नव्हती. याबाबत वाहतूक नियंत्रकांना विचारले असता, सध्या ‘टी टाइम’ असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तेथे पीएमपी अस्ताव्यस्त उभ्या केल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी संबंधितांना धारेवर धरल्यानंतर बस सोडण्यात आली.

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई करू.
-रमेश चव्हाण, आगार प्रमुख, कात्रज

Web Title: PMP employees in Katraj bus Station