अग्निशमन उपकरणांपासून  पीएमपी अद्यापही दूरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

 पीएमपीच्या ताफ्यातील बसमध्ये अग्निशमन उपकरणे न बसविल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने महापालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) मंगळवारी केली.

पुणे - पीएमपीच्या ताफ्यातील बसमध्ये अग्निशमन उपकरणे न बसविल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचने महापालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) मंगळवारी केली. महापौर मुक्ता टिळक यांनीही याबाबत कार्यवाही करण्याची सूचना पीएमपीला केली आहे. 

पीएमपीच्या ताफ्यातील बस अग्निशमन उपकरणांशिवाय फिरत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन उपकरणे आवश्‍यक आहेत. तसेच, त्या बसचे पासिंग होतानाही अग्निशमन उपकरणे असतात. मात्र, पासिंग झाल्यावर ही उपकरणे काढून टाकली जातात. शहर आणि पिंपरी चिंचवडमधून पीएमपी बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या बसला आग लागण्याच्या अनेक घटना दोन वर्षांत घडल्या आहेत. याबाबत महापौर टिळक यांनीही पीएमपीला सूचना दिल्या आहेत.  तसेच, अग्निशमन दलानेही १४ मार्च रोजी एका पत्राद्वारे पीएमपीला बसमध्ये अग्निशमन उपकरणे बसविण्याची सूचना केली आहे. मात्र, त्याचे पालन झालेले नाही. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार पीएमपी प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी संजय शितोळे यांनी एका निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याकडे केली आहे. 

‘फायर ऑडिट’ही प्रलंबित 
पीएमपीची कार्यशाळा, १३ आगार आणि प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट करावे, अशी सूचना अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी ८ ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे पीएमपीला केली आहे. त्याचा अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले होते; परंतु याबाबत कार्यवाही झालेली नाही, असेही मंचने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP is far from the fire equipment