‘पीएमपी’समोर देखभालीचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पीएमपीमधील नव्या बससाठी पुणे-पिंपरी- चिंचवड या दोन्ही महापालिका लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करीत असल्या, तरी त्या बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे

पुणे - पीएमपीमधील नव्या बससाठी पुणे-पिंपरी- चिंचवड या दोन्ही महापालिका लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करीत असल्या, तरी त्या बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पीएमपीमध्ये कार्यशाळेशी संबंधित १२०० कर्मचारी असले, तरी त्यातील अवघे १४० कर्मचारीची ‘आयटीआय’ उत्तीर्ण आहेत, तर उर्वरित बहुतांश कर्मचाऱ्यांना हेल्पर, फिटर या पदांवरून बढत्या मिळाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीमध्ये गेल्या दोन वर्षांत २०० मिडी बस, १५० ई-बस, सीएनजीवरील ४०० बस आल्या आहेत. पुढील काळात सीएनजी आणि ई-बस आणखी मोठ्या संख्येने घेण्यात येणार आहेत. येणाऱ्या नव्या बस अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहेत. नव्या बसची दुरुस्तीची कामे पहिली दोन वर्षे संबंधित उत्पादक कंपन्यांकडून होत असतात. मात्र, त्यानंतर त्या बसची  देखभाल स्थानिक आगारांतून होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. परंतु, त्यातून अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्याचे  प्रशासनाचे म्हणणे आहे. 

नव्या गाड्यांची देखभाल योग्य पद्धतीने न झाल्यास बसच्या आयुर्मानावर परिणाम होतो. बसमधील बिघाड वाढून तो दूर करण्यासाठीच्या खर्चातही वाढ होत असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले. कुशल कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘पीएमपीमध्ये किमान आयटीआय उत्तीर्ण उमेदवार नोकरीस यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भरतीप्रक्रियेत त्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल,’ असे पीएमपीचे सह व्यवस्‍थापकीय संचालक अजय चारठाणकर यांनी सांगितले. कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे बसच्या देखभाल- दुरुस्तीला मर्यादा येत नसल्याचा दावाही त्यांनी केला.  

खरेदी, भरतीमध्ये संचालकांना रस ! 
बसगाड्यांची खरेदी आणि कंडक्‍टर-ड्रायव्हरची भरती म्हणजेच पीएमपीचा विकास असा संचालक मंडळातील लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन असल्याचे गेल्या दोन वर्षांतील कारभारातून दिसून आले आहे. नव्या संचालक मंडळाचीही पावले त्याच दिशेने पडत असल्याचे चित्र आहे. आगारांसाठी जागा मिळविणे, तंत्रज्ञानयुक्त कुशल कर्मचारी उपलब्ध करणे, आगारांचे विकसन आदी अनेक मुद्द्यांकडे   दुर्लक्ष झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP maintenance issue