

पुणे, ता. २४ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमुळे अपघात झाल्यास त्यामुळे वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांस आता तीन लाख, तर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.
पीएमपीएलच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या कार्यालयात पार पडली. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मारणे, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या सभागृहात पीएमपीएमएल संदर्भात झालेल्या विशेष सभेमध्ये नागरिकांच्या बसमुळे होणाऱ्या अपघातामधील मालमत्तेच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, महापौर नागपुरे यांनी बस अपघातामधील नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत मुद्दा बैठकीत उपस्थित केला. त्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
‘पीएमपीएमएल’च्या स्वमालकीच्या बसगाड्यांना तृतीय पक्ष दायित्व विमा उतरविण्यातून शासनाने सवलत दिलेली आहे. त्यामुळे बस अपघातात व्यक्तीचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास आर्थिक मदतीसाठी २०१५ मध्ये संचालक मंडळाने स्वतंत्र धोरण निश्चित केले होते. मात्र, अपघातात दुकान, घर, वाहन किंवा अन्य वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत कोणतेही निश्चित धोरण नव्हते. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने आता मालमत्ता नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातानंतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन बाह्य संस्था किंवा तज्ज्ञांकडून करून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. संबंधित रक्कम देताना संबंधित मालमत्ताधारकाकडून प्रतिज्ञापत्रही घेण्यात येणार आहे. याबाबत नागपुरे म्हणाल्या, ‘‘पीएमपीएल बसच्या अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना, जखमी व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे. तसेच बस अपघातात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई आता मिळणार आहे.’’
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.