कंडक्टरचा प्रामाणिकपणा पाहून नागरिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML bus conductor save passengers money 2 lakh police pune

कंडक्टरचा प्रामाणिकपणा पाहून नागरिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू

कोथरुड : कात्रज वरुन कोथरुड कडे निघालेल्या बस मध्ये बसलेले दत्ता जनार्दन निगडे, वय ५४, रा. कात्रज हे आपली ऑफीस बँग बसमध्येच विसरले. त्यामध्ये दोन लाख रुपये होते. आपली बँग हरवल्याचे लक्षात येताच निगडे यांचे धाबे दणाणले. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार देखिल दाखल केली. दरम्यान कोथरुड बस डेपोत त्यांची बँग जमा झाल्याचे समजल्यावर जीवात जीव आला. कंडक्टरने दाखवलेला प्रामाणिकपणा पाहून निगडे यांना आपले अश्रू आवरता आले नाही.

बस वाहक संजय कदम हे बदली कंडक्टर म्हणून कामावर रुजु झाले. बस मध्ये आसनाखाली त्यांना एक बँग आढळली. त्यांनी ही बँग तातडीने कोथरुड डेपो मध्ये जमा केली. तपासणी केली असता त्यामध्ये विविध कागदपत्रे व सुमारे दोन लाखाची रोख रक्कम होती. रक्कम जमा केल्यानंतर कदम पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजु झाले. दरम्यान निगडे यांनी ओळख पटवून आपली बँग त्यामधील रोख रक्कम व कागदपत्रांसह ताब्यात घेतली. बँक ऑफ महाराष्ट्र पद्मावती येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये ते काम करतात. कामाशी संबंधीत असलेली रक्कम गायब झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. निगडे यांनी कदम व प्रशासनाचे आभार मानले.

संजय कदम म्हणाले की, महागाईच्या या काळात एकेक रुपयाचे महत्व काय असते हे आमच्यासारख्या कष्टक-याला वारंवार अनुभवायला येते. आपले काम प्रामाणिकपणे करणे हा संस्कार आम्ही आमच्या पुर्वजांकडून शिकलो. बस मध्ये कोणतीही वस्तु सापडल्यास ती डेपो मध्ये जमा करणे आमचे कर्तव्य असते, ते मी निभावले. ही बँग कोणाची आहे वा त्यात काय आहे याबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हते. अधिका-यांनी तपासणी केल्यावर त्यामध्ये एवढी मोठी रक्कम बघीतल्यावर ही बँग ज्याची असेल त्याच्यावर काय बेतले असेल याची कल्पना आली. निगडे यांना दिलासा मिळाला ही माझ्यासाठी कर्तव्यपुर्तीचे समाधान देणारी बाब आहे.