बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
Published on: 

पिंपरी, ता. १३ ः पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) सर्व बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अपघातांचे खरे कारण शोधण्यासाठी डॅश कॅमेरा बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या हा निर्णय संचालक मंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असला तरी बसमध्ये पूर्वीपासून बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले आहे. बसमधील सीसीटीव्ही बंद असल्याचा फायदा चोरट्यांकडून घेतला जात असून, अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतही काही भागांत सेवा दिली जाते. पीएमपीने गेल्या काही वर्षांत नव्याने घेतलेल्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे; परंतु बसमधील सीसीटीव्ही यंत्रणा काम करत नाहीत. जुन्या बसमध्ये सीसीटीव्हीची यंत्रणाच नाही. त्यामुळे मौल्यवान ऐवज चोरण्याबरोबरच कटरच्या साह्याने सोन्याच्या बांगड्या चोरण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. पीएमपीच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मोठी गर्दी असते. नेमक्या याच गाड्यांमध्ये चोरटे नागरिकांकडील मौल्यवान ऐवज लंपास करत असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांतून समोर आले आहे. चोरटे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलांना लक्ष्य करतात; पण सीसीटीव्हीच बंद असल्यामुळे चोरट्यांना शोधणे अवघड होते.

बसमध्ये चोरी करणाऱ्यांची टोळी
पीएमपी बसमध्ये चोरी करणाऱ्यांची टोळी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. या टोळीकडून प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या मार्गावर चोरीचे गुन्हे केले जातात. या टोळीत पुरुष आणि महिलांचाही समावेश असतो. गर्दी असलेल्या बसमध्ये चढून ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्याजवळ गर्दी करायची. या गर्दीतच मौल्यवान वस्तू किंवा ऐवज चोरून दुसऱ्या व्यक्तीकडे द्यायचा. चोरीचा माल मिळाल्यानंतर ती व्यक्ती तत्काळ दुसऱ्याच थांब्यावर उतरते. चोरीचा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झालेले असतात.

६५८ बस अजूनही कॅमेऱ्याच्या नजरेबाहेर
पीएमपीएमएलच्या ताफ्यास सुमारे दोन हजार १७२ बस आहेत. यापैकी एक हजार ५१४ बस ठेकेदारांच्या असून पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या सुमारे ६५८ बस आहेत. यापैकी ठेकेदारांच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश बसमधील कॅमेरे बंद आहेत. पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसमध्येच कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटनांनंतर पोलीसांना चोरांचा शोध घेताना अडचणी निर्माण होतात.

‘‘प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पीएमपीएमएलच्या खासगी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. मात्र, स्वमालकीच्या बसमध्ये अजून सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची आहे.’’
- नागेश गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

सद्यःस्थिती
- ताफ्यातील एकूण बस ः २,१७२
- सीसीटीव्ही यंत्रणाच नसलेल्या बस ः ६५८
- सीसीटीव्ही बसवलेल्या बस ः १,५१४
- सीसीटीव्ही फुटेज साठवणूक क्षमता ः ४ दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com