esakal | अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML_Bus

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची बससेवा सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. मात्र, या बाबत दोन्ही महापालिकांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली होती.

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 'पीएमपी'ची बससेवा ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता.२०) दिली. त्यामुळे गणेशोत्सवानंतर दोन्ही शहरांत पीएमपीच्या बस धावतील.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची बससेवा सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. मात्र, या बाबत दोन्ही महापालिकांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार पुणे महापालिकेतून गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात बससेवा गणेशोत्सव संपल्यावर सुरू करण्याचे ठरले, असे मोहोळ यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Video : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे काय आहेत आव्हाने?; पाहा 'सकाळ स्पेशल इंटरव्ह्यू'मध्ये!​

पीएमपीची बससेवा २२ ऑगस्टपासून सुरू होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतु, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण अजून सापडत आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बससेवा गणेशोत्सव पार पडल्यावर सुरू करावी, असा सूर बैठकीत उमटला. त्यानुसार बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएमपीची दोन्ही शहरांतील वाहतूक १८ मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. २५ मार्चपासून प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची वाहतूक सुरू आहे. त्यात सध्या २५० बस दररोज दोन्ही शहरांत धावत आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे पीएमपीचे गेल्या पाच महिन्यांत सुमारे २२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पीएमपीचे सुमारे ५ हजार कर्मचारी दोन्ही महापालिकांत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत.

राज्य सरकारने 'सीईटी'ची परीक्षा रद्द करावी; कुणी केली मागणी?​

बससेवा सुरू करताना पुरेशी काळजी घेण्याचेही बैठकीत ठरले. प्रत्येक बसमध्ये कमाल २२ प्रवासी असतील. प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज करण्यात येईल. तसेच बसमधील वातानुकूल यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे, असेही ठरले. बसचालक आणि वाहकांना या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बससेवा सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना, स्वयंसेवी संघटना आग्रही आहेत. त्याचीही दखल बैठकीत घेण्यात आली. खासदार गिरीश बापट यांनीही बससेवा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता 3 सप्टेंबरपासून दोन्ही शहरांतील निवडक मार्गांवर बससेवा सुरू होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image