अनधिकृत होर्डिंग्ज शोधणार ‘एआय’

अनधिकृत होर्डिंग्ज शोधणार ‘एआय’
Published on: 

पिंपरी, ता. १२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण प्राधिकरण क्षेत्रातील होर्डिंग्जचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यातून संकलित झालेल्या माहितीची छाननी सुरू असून, त्यानुसार अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे.
‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात नागरीकरणाचा वेग वाढत असल्याने अनधिकृत बांधकामे, जाहिरात फलक आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांची समस्या गंभीर बनली आहे. प्राधिकरणाच्या नऊ तालुक्यांमध्ये हजारोंच्या संख्येने होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. त्यात नव्याने उभारल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांचीही भर पडत आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रत्येक गावातील होर्डिंग्जची तपासणी करणे आणि त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवणे प्रशासनाला कठीण जात आहे.
ही समस्या लक्षात घेऊन ‘पीएमआरडीए’ने होर्डिंग डिटेक्शन सिस्टिमसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. एआयच्या माध्यमातून होर्डिंग्जची माहिती संकलित करून अधिकृत आणि अनधिकृत जाहिरात फलकांची ओळख पटविण्याचे नियोजन आहे. तसेच, अनधिकृत बांधकामे, होर्डिंग्ज आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचीही तयारी सुरू आहे. या यंत्रणेमुळे होर्डिंग्जवर नियमित देखरेख ठेवणे आणि कारवाईसाठी आवश्यक माहिती मिळविणे अधिक सोपे होणार आहे.

होर्डिंग मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन
होर्डिंग्जच्या मंजुरीसाठी यापूर्वी अर्ज सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जात होती. या प्रक्रियेत होर्डिंगधारकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे अर्जदारांना आवश्यक माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचेही नियोजन असून, प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

‘‘संपूर्ण पीएमआरडीए क्षेत्रातील प्रत्येक गावात होर्डिंग्जचे एआयच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून मिळालेल्या माहितीची आणि ऑनलाइन उपलब्ध नोंदींची छाननी सुरू आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.’’
- के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com