
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सादर करण्यात आलेल्या नगर रचना (टीपी) योजनांचे प्रस्ताव तब्बल दीड वर्षांपासून राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहेत. त्यामुळे नियोजित विकास कामे रखडली असून विशेषतः हिंजवडीसारख्या आयटी क्षेत्रांमध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या अधिकच तीव्र होत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पर्यायी रस्त्यांचा अभाव असून या भागांत दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून नव्या रस्त्यांची गरज आहे. मात्र, ‘टीपी’ योजनेला मंजुरी मिळत नसल्याने या भागातील विकासकामे सुरू होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. माण-मारुंजी भागातील रस्तेही टीपीमध्ये समाविष्ठ आहेत.
मात्र त्या ठिकाणी कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांना सुसज्ज रस्ता उपलब्ध होत नाही. शासनाने पुणे महानगर परिसरातील पूर्वीचा विकास आराखडा (डीपी) रद्द केल्यानंतर नव्याने टीपी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डिसेंबर २०२३ मध्ये पीएमआरडीएने सहा ठिकाणी ‘टीपी’ योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील माण, महाळुंगे, हवेलीतील वडाचीवाडी, हांडेवाडी, मांजरी व होळकरवाडी (२ योजना) यांचा समावेश आहे. परंतु अद्याप या प्रस्तावांना हिरवा कंदील मिळालेला नाही.
या योजनेसंदर्भात जून महिन्यात मंजुरीचा अध्यादेश निघण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे. पीएमआरडीएकडून आणखी १५ नव्या ‘टीपी’ योजना तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामध्ये सांगवडे, बावधन बुद्रुक, नेरे, दारुंब्रे/साळुंब्रे (दोन ‘टीपी’), गोदुंबरे, धामणे - (२ ‘टीपी’), माण, वडकी, मांजरी खुर्द (३ ‘टीपी’), आव्हाळवाडी आणि वाघोलीचा समावेश आहे. मात्र, जुन्याच योजनांना मंजुरीचा मुहूर्त मिळत नसताना नव्या योजना कधी मार्गी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीएमआरडीएकडून प्रारूप योजना आराखड्याला ३१ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी
प्राथमिक योजनेचा प्रस्ताव लवादाने राज्य शासनाकडे २१ डिसेंबर २०२३ रोजी पाठविला
पीएमआरडीएकडून आणखी नव्या १५ नव्या ‘टीपी’ योजनांचे काम सुरू
‘टीपी’ योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. परंतु अद्याप त्याबाबत मंजुरी मिळालेली नाही. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.