पवनमावळातील शेतकऱ्यांचा अंतर्गत रिंगरोडला विरोध

पवनमावळातील शेतकऱ्यांचा अंतर्गत रिंगरोडला विरोध
Published on: 

सोमाटणे, ता. १२ : ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित केलेल्या ६५ मीटरच्या अंतर्गत रिंगरोडला पवनमावळातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा रस्ता नवीन करण्याऐवजी गावांना जोडणाऱ्या जुन्या रस्त्याचेच रुंदीकरण करून तो पाचाणे येथील ११० मीटरच्या मुख्य रिंगरोडला जोडावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या प्रकल्पाबाबत भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार, उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके, उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्या पथकाने बाधित गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नेरे, सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, परंदवडी, धामणे या गावांत विशेष बैठका घेऊन रिंगरोडचे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला.
पवना, कासारसाई, आढले, मळवंडी, पुसाणे धरणे, द्रुतगती मार्ग, क्रिकेट स्टेडियम आणि ११० मीटर रिंगरोडसाठी यापूर्वीच जमिनी गेल्या आहेत. अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, आता उरल्यासुरल्या जमिनीही घेतल्यास जगायचे कसे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नेरे-कासारसाईमार्गे असलेल्या जुन्या रस्त्याची रुंदी ६५ मीटर करून तो पाचाणे येथील रिंगरोडला जोडल्यास शेतकरी वाचतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. तीन दिवस चाललेल्या या बैठकांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.

Related Stories

Pune Building Permission New Rules PMRDA Makes Layout Road Transfer and Satbara Record Update Compulsory for Developers
Chakan Road Works
Farmer Agitation in Lohara
tushar jadhav
Marathi News Esakal
www.esakal.com