कार्यालयांचा थाट, कामकाजाकडे पाठ

कार्यालयांचा थाट, कामकाजाकडे पाठ
Published on

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह हवेली, मुळशी, मावळ, खेड, भोर, वेल्हे, पुरंदर, शिरूर, दौंड या तालुक्यांचा समावेश आहे. ‘पीएमआरडीए’ समाविष्ट गावांतील नागरिकांच्या सोईसाठी नऊ विभागीय कार्यालये सुरू केली आहेत. मात्र, तिथे अनेकदा अधिकारी, कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होते, अशा तक्रारी आहेत. त्यांची शहानिशा करण्यासाठी ‘सकाळ’ने सर्व कार्यालयांना मंगळवारी (ता.२३) सकाळी ११ ते १२ या वेळेत भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यात तथ्यही आढळले. त्यामुळे विभागीय कार्यालये केवळ दिखावा आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


१ : खेड चाकण
अधिकाऱ्यांचा पोबारा; नागरिक मारती चकरा
चाकण : खेड तालुक्याचे कार्यालय चाकण येथे आठ महिन्यांपूर्वी सुरू केले. पण, अधिकारी-कर्मचारी अनेकदा नसतात, असा नागरिकांचा आरोप आहे. प्रत्यक्षात पाहणी केली, तेव्हा एक कंत्राटी कर्मचारी व एक शिपाई हजर होते. नागरिकही नव्हते. सहायक नगररचनाकार कामानिमित्त आकुर्डीला गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी कार्यालयाची वेळ आहे. पण, अधिकारी, कर्मचारी नसल्याने नागरिकांना तक्रारी मांडता येत नाही. तळेगाव चौकातील कार्यालय खासगी इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आहे. तिथे फलक नसल्याने कार्यालय शोधावे लागते.

वस्तुस्थिती
- लँडलाइन फोन नाही
- अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले जातात
- इमारतीसमोर पार्किंग आहे
- स्वच्छतागृह आहे
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही

पंधरा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. आकुर्डी मुख्य कार्यालयातील व इतर कामे असल्यामुळे मी तिकडे गेलो होतो. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी असतात.
- शुभम वाकचौरे, सहायक नगररचनाकार

10710

२. मावळ
अधिकारीच गायब; नागरिकांची गैरसोय
तळेगाव दाभाडे : मावळ क्षेत्रीय कार्यालय मंगळवारी (ता. २३) खुले होते. पण, सकाळी ११ ते १२ या वेळेत कोणीही अधिकारी नव्हते. विविध परवानग्या, बांधकामविषयक बाबी, तक्रारी आणि नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित कामकाज येथे केले जाते. त्यासाठी सहा पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात एक महिला शिपाई आणि एक कर्मचारी उपस्थित होते.

वस्तूस्थिती
- तालुक्यासाठी एकमेव कार्यालय
- लँडलाइन फोनचा अभाव
- तक्रार पेटी नाही, अर्जांबाबत नाराजी
- वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
- अधिकाऱ्यांअभावी नागरिकांची गैरसोय

मंगळवारी कार्यालयीन कामकाजानिमित्त आम्ही आकुर्डी मुख्य कार्यालयात गेलो होतो. त्यामुळे मावळ कार्यालयात अधिकारी वर्ग उपस्थित नव्हता.
- विक्रम देवकर, सहायक महानगर नियोजनकार, विकास परवानगी विभाग
05608

३. हवेली १ - वाघोली
कार्यालय नावापुरते; केवळ शिपाई उपस्थित
वाघोली : लोहगाव रस्त्यावर अग्निशामक दलाच्या आवारातील इमारतीत पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयात तीन अधिकारी, तीन संगणक चालकांची नेमणूक आहे. मात्र, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ एक शिपाई आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. रस्त्यावर किंवा इमारतीबाहेर कार्यालयाचा फलक नाही. केवळ संगणक चालक कार्यालयात असतात, असे समजले. मंगळवारी तेही उपस्थित नव्हते. अन्य अधिकारी कधी तरी येतात. खासगी कंपनीचा स्वच्छता कर्मचारी आणि शिपाई कार्यालयात होते.

वस्तूस्थिती :
- कार्यालय स्वच्छ होते, पाण्याची व्यवस्था
- लँडलाइन फोन नाही.
- अर्ज स्वीकारण्याशिवाय कोणतेही काम होत नाही
- दिशादर्शक फलक नसल्याने नवीन व्यक्तींना कार्यालय सापडणे कठीण
- पार्किंगची व्यवस्था आहे

82301

४. हवेली-२ औंध

औंध : येथील कार्यालयात ११ ते १२ या वेळेत शुकशुकाट होता. ‘पीएमआरडीए’ अंतर्गतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट आहेत. त्यांच्या ग्रामपंचायत नोंदींसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचे हस्तांतरण आणि पावसाळी अधिवेशनासाठी आवश्यक माहिती देण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आकुर्डी येथील कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात पाठवल्याचे सांगण्यात आले. कामासंदर्भात नागरिकही आढळले नाहीत. फक्त एक शिपाई उपस्थित होता.

वस्तुस्थिती
अधिकारी व कर्मचारी नव्हते
संपर्कासाठी लँडलाइन फोन आहे
पार्किंग, स्वच्छतागृह उपलब्ध आहे
नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आहे
तक्रार व अन्य अर्ज स्वीकारण्याची सुविधा
82314

५. दौंड-यवत : लोगो

शिपाईभरोसे कार्यालय
यवत : क्षेत्रीय कार्यालय शिपाईभरोसे दिसले. येथील फलकानुसार शिपायासह सात कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. बहुतांश कर्मचारी हंगामी आहेत. कार्यालय सुस्थितीत असले, तरी लोकांचा फार राबता दिसून येत नाही. लोकांच्या भेटीच्या खतावणीनुसार फेब्रुवारी-१८, मार्च-३, एप्रिल-९, मे-६, जून-७ अशी मोजकीच संख्या आढळली. कार्यालय प्रमुख आणि अन्य कर्मचारी कामानिमित्त बाहेर होते.

अधिवेशनामुळे ‘पीएमआरडीए’ विभागासंबंधीच्या कामासाठी मुंबईला यावे लागले. कार्यालयात मनुष्यबळ काहीसे कमी असले, तरी लोकांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेतो.
- शंतनू बारवकर, सहनगर रचनाकार
01579

वस्तूस्थिती
- अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते
- कार्यालयात फक्त महिला शिपाई उपस्थित
- कार्यालय सुस्थितीत. पुरेशा सुविधा
- लोकांचा फार राबता दिसला नाही
- कर्मचाऱ्यांची कमतरता कायम

७. भोर-वेल्हे
फलक नसरापूरला; कार्यालय वरवेला

नसरापूर : भोर व राजगड (वेल्हे) तालुक्यांसाठीचे विभागीय कार्यालय नसरापूरला होते. ते बंद करून वरवे (ता. भोर) गावात एका सदनिकेत सुरू केले आहे. फलक मात्र नसरापूरलाच आहे. हे कार्यालय नसरापूर ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत होते. ती धोकादायक झाल्याने अन्य ठिकाणी नेले. मात्र, ते अनेक महिने बंद होते. नागरिकांना औंध किंवा आकुर्डीला जावे लागत होते. ते दूर असल्याने नसरापूर कार्यालय सुरू होणे आवश्यक होते. मात्र, ते वरवे येथे नेण्यात आले. त्याची नागरिकांना अद्याप काहीच माहिती नाही.

वस्तूस्थिती
- कार्यालय वरवे गावात, पण नागरिकांना माहिती नाही
- कार्यालय पूर्वीप्रमाणे मध्यवर्ती ठिकाणी असावे
- अधिकारी, कर्मचारी, शिपाई उपस्थित
- सोसायटीच्या जागेत पार्किंग सुविधा
- लॅंडलाइन, पिण्याचे पाणी उपलब्ध


नसरापूर येथे हवी तशी जागा न मिळाल्याने वरवे येथे कार्यालय सुरू केले आहे. ते नसरापूरपासून दूर आहे. याबाबत माहिती पत्रके वाटली असून ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर पत्ता जाहीर केला आहे.
- उदय विभांडिक, सहायक नियोजनकार
06459

८. पुरंदर
सासवड : जेजुरी रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीजवळ हे क्षेत्रीय कार्यालय गेल्या दीड महिन्यांपासून कार्यरत आहे. मात्र, माहितीअभावी नागरिक फिरकतच नसल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून केवळ दोन तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. नागरिकांना आजही आकुर्डीतील मुख्य कार्यालयात जाण्याचीच सवय असल्याने स्थानिक कार्यालयाचा उपयोग शून्य झाला आहे. प्रशस्त कार्यालय असूनही नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

वस्तुस्थिती
- अधिकारी अनुपस्थित
- लँडलाइन फोन नाही
- पिण्याच्या पाण्याची सोय नाही
- स्वच्छतागृह, पार्किंगची सोय आहे
- तक्रार अर्ज स्वीकारले जातात

आम्ही तक्रार अर्ज स्वीकारत आहोत. ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. मंजूर मनुष्यबळ १५ गावांसाठी पुरेसे आहे. दोन अभियंते असून त्यांच्याकडे दुसऱ्या तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार आहे.
- मारुती नेमाणे, सहायक नगररचनाकार
06981

९. मुळशी चांदे
पिरंगुट : मुळशी क्षेत्रीय कार्यालयात दुपारी बारापर्यंत शुकशुकाट होता. अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते. अधिकारी- कर्मचारी नसल्याने नागरिकांना आकुर्डीतील कार्यालयात जावे लागते. चांदे येथील कार्यालयात केवळ आवक जावक स्वरुपाचे कामकाज पाहिले जाते. सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक महानगर नियोजनकार गोपाळ काळे येथील कामकाज पाहतात. सोनाली अहिरे या अधिकारी सोमवारी येतात.

वस्तुस्थिती
- सकाळी १०.३० वाजता कार्यालय खुले
- कंत्राटी कर्मचाऱ्याने स्वच्छता केली होती
- लँडलाइन फोन नाही. मात्र, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक फलकावर उपलब्ध
- पार्किंग पुरेसे, स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणी आहे
- पूर्ण मनुष्यबळ मंजूर असूनही उपलब्ध होत नाही

कार्यालयीन वेळेत कामकाज सुरू असते. होर्डिंग तसेच अन्य कामांसाठी मुख्य कार्यालयात जावे लागते. बैठक असेल तरच आकुर्डीला जावे लागते. कोणतेही काम अडून राहिलेले नाही.
- गोपाळ काळे, सहायक महानगर नियोजनकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com