घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारणार का?

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारणार का?
Published on: 

उरुळी कांचन, ता. १० : उरुळी कांचनने नाकारलेला... थेऊरने तारलेला घनकचरा व्यवस्थापन आधुनिक प्रकल्प, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कृपेने साकारणार का?, अडथळा शर्यतीत अडकणार अशी चर्चा पूर्व हवेलीत सुरू झाली आहे. तर ग्रामपंचायतींना वाहतूक खर्च करावा लागणार असल्याने ‘टिपींग फी’ आकारणीबद्दल काही माजी सरपंचांनी नाराजी व्यक्त केली.
पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) यावर दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. थेऊर परिसरातील १३ गावांसाठी (१४ ग्रामपंचायती) अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास पीएमआरडीएने मंजुरी दिली असून, यासाठी थेऊर येथील सुमारे १० एकर गायरान जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या प्रकल्पामध्ये थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोलवडी या गावांचा समावेश गृहीत धरला आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन सन २०४३मधील संभाव्य गरजांनुसार हा प्रकल्प डिझाईन करण्यात आला आहे. प्रतिदिन १५० टन (TPD) कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची असेल.’’
प्रकल्प स्थळापासून २० किलोमीटरच्या अंतरातील ग्रामपंचायती या प्रकल्पात सहभागी होऊ शकतील. आपापल्या भागातील कचरा संकलित करून तो प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची असेल. जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी निश्चित केलेली ''टिपिंग फी'' ग्रामपंचायतींना पीएमआरडीएकडे जमा करावी लागेल. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आपापल्या मासिक किंवा ग्रामसभेत मंजुरीचा ठराव पास करून पीएमआरडीएकडे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असताना पीएमआरडीएच्या या उपक्रमामुळे हवेली तालुक्यातील पूर्व भागाला कचरामुक्त होण्यास मदत होईल अन् परिसराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com