कविवर्य मोरोपंत नवीन पिढीच्या भेटीला

मिलिंद संगई
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अलौकिक प्रतिभेचे कविवर्य मोरोपंतांच्या साहित्याचे नुकतेच पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. कविवर्य मोरोपंत स्मारक समितीने हे काम पूर्ण केले आहे.

बारामती शहर (पुणे) : अलौकिक प्रतिभेचे कविवर्य मोरोपंतांच्या साहित्याचे नुकतेच पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. कविवर्य मोरोपंत स्मारक समितीने हे काम पूर्ण केले आहे.

श्रीमंत बाबूजी नाईकांकडे कविवर्य मोरोपंत हे नवरत्नांपैकी एक म्हणून कार्यरत होते. इ.स. 1729 ते 1794 या कालखंडामध्ये मोरोपंतांनी 75 हजार काव्यरचनांचे लेखन केले. यात 186 आर्यांचाही समावेश आहे. शब्दांवर अफाट प्रभुत्व असलेल्या मोरोपंतांनी निरोष्ठ रामायणाचीही रचना केली आहे. या रामायणाचे वाचन करताना कोणताही शब्द उच्चारला तरी ओठांना ओठ लागत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. केकावली, आशंसाष्टक, महाभारत, मंत्ररामायण, हरिवंश, कृष्णविजय, मंत्रभागवत, ब्रह्मतोरखंड अशा त्यांच्या रचना आजही तितक्‍याच वाचनीय आहेत. शब्दसामर्थ्यासोबतच दोन्ही हातांनी तितक्‍याच एकसारखेपणाने व वेगाने लिहिण्याची कलाही मोरोपंतांना अवगत होती. त्यांचे मूळ हस्ताक्षर आजही उपलब्ध असून प्राकृत भाषेतील त्यांचे हे हस्ताक्षर आहे.

स्त्रीगीते- सीता, सावित्री व रुक्‍मिणी गीत हे अनंत काकबा प्रियोळकर लिखित, संशय रत्नावली हे माधव ना. आचार्य लिखित, भक्तमयूर केकावली हे रामकृष्ण दत्तात्रयपंत पराडकरलिखित, मोरोपंतांची स्फुट काव्ये हे प्रियोळकरलिखित तीन भागातील तसेच मोरोपंतांचे समग्र चरित्र हे ल. रा. पांगारकरलिखित तसेच देवादिकांच्या प्रार्थना, स्तुतिस्तवन अशी मोरोपंतांच्या साहित्यावर आधारित पुस्तके पुनर्मुद्रित करण्यात आली आहेत.

मोरोपंतांशी संबंधित साहित्य नवीन पिढीला माहिती व्हावे, त्यांचे शब्दसामर्थ्य किती अफाट होते याची जाणीव व्हावी, काळाच्या ओघात हे साहित्य नामशेष होऊ नये, या उद्देशाने कविवर्य मोरोपंत स्मारक समितीच्या वतीने या पुस्तकांचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. मोरोपंतांचा वारसा जतन व्हावा, असाच या उपक्रमामागील हेतू आहे.
- माधव जोशी, अध्यक्ष, कविवर्य मोरोपंत स्मारक समिती, बारामती

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poet Moropants Literature Republished