लॉकडाउनच्या काळामध्ये वालचंदनगर पोलिसांनी केले असे की,...

राजकुमार थोरात
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लॉकडाउनच्या काळामध्ये वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये शासकीय नियम मोडणाऱ्या नागरिकावर  वालचंदनगर पोलिसांनी कारवाई करुन ३ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच अवैध धंद्यावरती छापे मारुन ८५ हजार रुपयांचा मुद्दे माल व १ लाख ६० हजार रुपयांची वाहने जप्त केले असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

कोरोनाच्या महामारीमुळे केंद्र सरकार व राज्यसरकारने लॉकडाऊन जाहिर केले होते. या कालावधीमध्ये अनेक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून संचारबंदीच्या काळामध्ये दुकाने सुरु ठेवणे, दुचाकीवरुन ट्रिपल सिट फिरणे, सोशल डिस्टिंगचे नियम मोडणे, मास्क न वापरता प्रवास करण्याचे प्रकार केले.

वालचंदनगर पोलिसांनी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कारवाईचा बडगा उगारला. लॉकडाउनच्या काळामध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या १५६४ नागरिकावर कारवाई करुन ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.कारवाई करताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडून रस्त्यावर फिरणे, दुकानांची वेळ न पाळणाऱ्या १६४ नागरिकावर गुन्हे दाखल केले. यातील २८ गुन्हाचे निकाल न्यायालयाने दिले असून ५७ हजार ४०० रुपयांचा दंड  केला. मोटार वाहन कायद्यानूसार ३६२ नागरिकावर कारवाई करुन ७३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच पश्‍चिम भागामध्ये  अवैध धंदे करणाऱ्या ४८ दारुच्या अड्यावर छापे टाकून ४७ जणांनी अटक केली. त्यांच्याकडून ७२ हजार रुपयांचे मुद्देमाल व ८५ हजार रुपयांची वाहने जप्त केली. तसेच १२ जुगारीच्या अड्यावर छापे टाकून जुगार खेळणाऱ्या ४७ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ हजार ८०५ रुपयांची रोखड व ८० हजार रुपयांची वाहने जप्त केल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against those who break the law during the lockdown