अंडी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण

डी के वळसे-पाटील
गुरुवार, 26 मार्च 2020

- जुन्नर तालुक्यात 16 लाख अंडी पडून

मंचर : जुन्नर तालुक्यातून अंबरनाथ भागात अंडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. पण ट्रक माघारी येत असताना मात्र अंबरनाथ मुरबाड शहापूर गाडी फुल येथे ट्रकचालकाला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे मुंबई भागात ट्रक घेऊन जाण्यास चालकांनी नकार दिल्यामुळे जुन्नर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सोळा लाख अंडी पडून आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पण पोलिसांच्या या कारवाई बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओतूर येथील साई पोल्ट्रीचे मालक ॲड. सचिन तांबे  थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोबाईलद्वारे संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती देणार आहेत.

जुन्नर तालुक्यात अंडी उत्पादन करणाऱ्या ८ पोल्ट्री आहेत. प्रत्येक परतून सरासरी 35 ते 40 हजार अंड्याचे उत्पादन निघते. ही अंडी प्रामुख्याने पुणे व मुंबई शहरात पाठवले जातात. पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील लेअर फार्मर्सच्या मालकीचा अंड्यांचा ट्रक रविवारी ता 22 रोजी रात्री मुंबईला जाताना माळशेज घाटातील कोंडीत अडकला.

पोलिसांनी अंड्याचा ट्रक पाहिला. अत्यावश्यक सेवा म्हणून दोन किलोमीटरची रांग तोडून अंड्याचा ट्रक मुंबईला रवाना केला. पण तोच ट्रक अंडी खाली केल्यानंतर तेथेच अंबरनाथ पोलिसांनी मारहाण केली. माघारी परतताना अंबरनाथपासून पुढच्या मुरबाड, उमरोली, शहाड पूल चेक नाक्यावर पोलिसांनी दमदाटी, मारहाण केली नितीन उल्हास तांबे असे ट्रकचालकाचे नाव आहे. ही माहिती वाऱ्यासारखी सर्व अंडी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये पसरली.

आता ड्रायव्हर म्हणतात, आम्ही मुंबईला अंड्यांची गाडी नेणार नाही. ओत्तूर येथीलसाई पोल्ट्री मध्ये चार लाख अंडी पडून आहेत तर जुन्नर तालुक्यात एकूण 16 लाख अंडी सध्या पडून आहेत. आधीच अडचणीत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांचे आतोनात हाल सुरू झाले आहेत.

सरकारी स्टिकर्स द्या

यंत्रणांनी कुठलीही व्यवस्था लावली नाही. इथे, अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना सरकारी स्टिकर किंवा पास द्या. म्हणजे रिकाम्या गाड्यांना त्रास होणार नाही. 

तसेच पंधरा दिवसांपूर्वीच लॉक डाऊनची वेळ येणार हे स्पष्ट होते. प्रशासकीय यंत्रणा नेमके काय काम करत होती, असा प्रश्न निर्माण होतो.

यासंदर्भात ऍड तांबे म्हणाले, मुंबई शहर उपनगरातून अंड्यांना मागणी वाढलेली आहे. पण पोलिसांच्या दहशतीमुळे चालक आता ट्रक-टेम्पो घेऊन मुंबईलाजाण्यास धजावत नाहीत. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे या मागणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Beaten to Egg Truck Driver