
दहा हजारांच्या लाचप्रकरणी सहायक पोलिस फौजदारासह पोलिस नाईक ताब्यात
पुणे - अपघाताच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने सहायक पोलिस फौजदारासह पोलिस नाईकला ताब्यात घेतले आहे.
दोघेही हवेली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी (ता. २१) रात्री सिंहगड रस्त्यावर अभिरुची मॉलच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.
सहायक पोलिस फौजदार श्रीपती माणिक कोलते (वय ५५) आणि पोलिस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (वय ३४) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी हवेली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी कोलते यांनी केली होती. ही रक्कम मंगळवारी कोलते यांनी जगताप यांच्यामार्फत स्वीकारली. त्यानुसार दोघा पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली. विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Web Title: Police Constable And Police Naik Arrested In 10000 Bribe Case Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..