Pune : दौंड येथे हुतात्मा पोलिसांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस हुतात्मा दिन

Pune : दौंड येथे हुतात्मा पोलिसांना अभिवादन

दौंड : कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या देशातील पोलिस अधिकारी व जवानांना दौंड शहरात पोलिसांच्या वतीने मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक पाच येथील मैदानावर हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आले.

देशभरात १ सप्टेंबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या नामावलीचे वाचन करण्यात आले. एसआरपीएफ गट क्रमांक सातचे समादेशक वसंत परदेशी, गट पाचच्या समादेशक विनिता साहू, नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामचंद्र केंडे यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

धीरगंभीर वातावरणात बॅण्‍ड पथकाने शोक धून वाजविली आणि रायफलीच्या हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या.एसआरपीएफ आणि राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एकूण ५१ अधिकारी व १३६४ पोलिस कर्मचारी यांच्यासह नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते

पोलिस हुतात्मा दिन

लडाखच्या पूर्वोत्तर भागातील हॉटस्प्रिंग येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजीकेंद्रीय राखीव पोलिस सुरक्षा दलाच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या बटालियनने केलेल्या हल्ल्यात भारताचे दहा जवान हुतात्मा झाले होते. सर्वोच्च बलिदान देणार्या या पोलिसांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि या हुतात्मा झालेल्या पोलिसांप्रमाणे राष्ट्रनिष्ठेची ज्योत पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तेवत राहावी, याकरिता जानेवारी १९६० मध्ये झालेल्या देशाच्या सर्व पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेत दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पोलिस हुतात्मा दिनी अभिवादन केले जाते.