esakal | coronavirus: पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

police

पुणे पोलिसांनी तब्बल तीन लाख 93 हजार 354 अन्नाची पाकिटे व अन्नधान्य देत त्यांचे जगणे सुकर केले.

coronavirus: पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना शहरातील गरीब, गरजू, बेघर, कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध घटकातील लोकांना पुणे पोलिसांनी तब्बल तीन लाख 93 हजार 354 अन्नाची पाकिटे व अन्नधान्य देत त्यांचे जगणे सुकर केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी खास 'सोशल पोलिसिंग सेल' हा पोलिसांचा स्वतंत्र आपत्कालीन विभाग यासाठी सुरू केला आहे. 

शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, पोलिसांनी 22 मार्चपासून शहरात प्रारंभी जमावबंदी व नंतर संचारबंदी लागू केली. संचारबंदी आदेशामुळे गरीब, गरजू, कामगार, मजूर, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. याबरोबरच नाकाबंदी असल्याने नागरिकांना अन्य ठिकाणी किंवा बाहेरगावी जाणेही शक्य झाले नाही. त्यामुळे हजारो नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

या सगळ्या परिस्थितीची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम  यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या नागरिकांना स्थानिक पोलिस ठाणे, वाहतूक विभाग यांच्यामार्फत विविध घटकांना अन्नाची पाकिटे, अन्नधान्य देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी सांगितले. त्यानुसार, शहरातील 30 पोलिस ठाण्याच्या माध्यमातून मदत देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून तयार अन्नाची पाकिटे, अन्नधान्याची पाकिटे, सॅनीटायजर , मास्क, साबण, पाण्याच्या बाटल्या अशी मदत गोळा करून ती वाटण्यात आली. विविध रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना देखील ही मदत देण्यात आली. 

सोशल पोलिसिंग सेल सुरूच राहणार 
'सोशल पोलिसिंग सेल'चे काम केवळ कोरोनापुरतेच  मर्यादित न ठेवता, यापुढेही ते सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्या गरजूंना मदत हवी आहे आणि ज्यांना ती करण्याची इच्छा आहे, अशा दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी दररोज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत 8806806308 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉटस्अप मेसेज करावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी केले आहे. 

loading image
go to top