भिगवण पोलिसांची वाळू माफियांवर कारवाई; बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 24 September 2020

इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी येथे अवैदय वाळू उपसा करणाऱ्यांवर येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने धडक कारवाई करत सुमारे साडेबारा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भिगवण ( पुणे) : इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी येथे अवैदय वाळू उपसा करणाऱ्यांवर येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने धडक कारवाई करत सुमारे साडेबारा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सात परप्रांतिय व तीन स्थानिक बोट चालक व मालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

अवैदय़ वाळू उपसा प्रकरणी बोटचालक शौकत कमरुद्दीन शेख (वय ३२, रा.मनसिंहा,झारखंड), बाहुद्दीन मुजामिल शेख (वय २० रा.बेगमगंज, झारखंड), रफिक दानेश शेख (वय ३२ रा.बेगमगंज, झारखंड), हन्नन बजरुद्दीन शेख (वय ३४ रा.तिनहारिया,झारखंड), मनीरुल कमरुद्दीन शेख (वय ३५ रा.मनसिंहा, झारखंड), रोहित मज्जामिल शेख (वय २७, रा.दरगाडांगा, झारखंड), मुबारक मिरज शेख (वय २६ रा.पहाडगाव, झारखंड) आकाश सुरेश सावंत (वय १९, रा बाभळगांव, ता.कर्जत जि.अहमदनगर), तसेच बोटमालक सोन्या बाळासाहेब सरक (वय२५ रा. कात्रज ता.करमाळा जि.सोलापूर) ज्ञानेश्वर शिवाजी सोळंके     (रा.वीरवाडी मदनवाडी ता.इंदापूर) यांचेविरुध्द भारतीय दंड विधान कलम ४३९, ३७९ व ४३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी इन्कलाब रशिद पठाण यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी गावचे हद्दीत भिमा नदीवर उजनी जलाशय़ात यातील आरोपी हे दोन मोठ्या बोटी व एक लहान बोटीच्या माध्यमातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा व विनापरवाना वाळु उपसा करत होते. भिगवण पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकून दोन लोखंडी बोटी, एक लहान बोट व वाळू असा एकूण सुमारे बारा लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा माल घटनास्थळावरुन जप्त केला आहे. या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. भिगवण पोलिसांनी केलेल्या या ध़़ा़डसी कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, तक्रारवाडी येथे अवैदय वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणखीही कोठे अवैदय वाळू उपसा सुरु असल्यास नागरिकांनी माहिती दयावी प्रशासन त्यावर सक्त कारवाई करेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have taken action against illegal sand dredgers at Takrarwadi in Indapur taluka