esakal | कात्रज परिसरात अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कात्रज परिसरात अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात सर्रास अवैध धंदे चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. भारती विद्यापीठ परिसरातील मोहननगरमध्ये आणि राजे चौकातून जवळ असणाऱ्या शिव कॉलनीच्या परिसरात भरदिवसाही गावठी दारूची विक्री होताना दिसत आहे. त्याचबरोबर कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कृष्णसागर हॉटेलच्या समोरील बाजूस गावठी दारूचा व्यवसाय चालतो. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांगडेवाडी गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांचे अवैध धंद्यांना अभय आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

त्याचबरोबर, कात्रज परिसरातील कात्रज चौक आणि इतर ठिकाणी दुकानांना पडदे लावून ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टे, सोरट, जुगार, अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतात. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्येही कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतील नियमांची पायमल्ली करत या परिसरात लॉटरी सेंटर व सरकारमान्य गेम सेंटरच्या नावाखाली बिनधास्त सोरट, जुगार, चालू आहेत. परिसरात या दुकांनांची संख्याही वाढली असून दुकानांना पडदे लावून बंदी असणारे खेळ सुरू असतात.

कोरोना काळात हातचे काम गेलेले अनेक मजूर, तरुण, नागरिक या अवैध धंद्याकडे वळत असून कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात कंगाल होताना दिसत आहेत. कमी वयात तरुणवर्ग व्यसनाधीनतेकडे वळत आहे. या व्यवसायामुळे या परिसरात पान टपऱ्यांचीही चलती आहे. तसेच बंदी असलेला गुटखादेखील सर्रासपणे विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील टपऱ्यांमध्ये बंदी असणारा गुटखा मिळत आहे. या व्यवसायांना वेळेचेही कुठले बंधन दिसत नाही. रात्री दहाची वेळ असताना या टपऱ्या बारा वाजेपर्यंत चालू असतात. एकूणच पोलीस प्रशासन घडलेल्या गुन्ह्यांची उकल तात्काळ करत असून, अवैध धंद्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

अशा प्रकारचे अवैध धंदे कुठेही चालू नाहीत. सातत्याने कारवाई करण्यात येते. मात्र, अवैध धंदे चालू असललेल्या ठिकाणांची योग्य ती माहिती घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. तशा सूचनाही देण्यात येतील.

- सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त

loading image
go to top