Coronavirus : पिंपरीत भाजी विक्रेत्यांना पोलिसांची मारहाण, किराणा दुकानेही केली बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामधून किराणा माल, भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे.

पिंपरी : पिंपरी कॅम्प येथील श्री लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गर्दी झाल्याने पोलिसांनी भाजी विक्रेत्यांवर किरकोळ लाठीमार केला. तसेच किराणा मालाची दुकानेही जबरदस्ती बंद पाडली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामधून किराणा माल, भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भाज्या खरेदी साठी गर्दी झाली होती. त्यामुळे, पोलिस तातडीने तेथे दाखल झाले. गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यात, १० ते १२ भाजी विक्रेत्यांसह काही ग्राहकांना देखील लाठीचा प्रसाद खावा लागला, असे भाजी मंडईचे अध्यक्ष सुनील कुदळे यांनी सांगितले. त्यामुळे, गर्दी टाळण्यासाठी पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मंडई खुली ठेवली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पिंपरी कॅम्प येथील किराणा माल दुकानेही बंद ठेवण्यास पोलिसांनी भाग पाडले. मंडई आणि किराणा माल दुकानांतील कामगार, मजूरांना देखील पोलिसांनी लाठ्यांनी चोप दिला. त्यामुळे, किराणा मालाची घाऊक दुकाने दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला. दुकाने आणि भाजी मंडई येथील काही कामगारांनी कामावर न येणेच पसंत केले.

पिंपरी चिंचवड किराणा माल घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्याम मेघराजानी यांनीही त्याला दुजोरा दिला. तसेच याबाबत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Lathi Charged on Vegitable Seller in Pimpri